वारंवार घडणार्या अत्याचारांच्या घटनांमुळे श्रीगोंद्यात अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचे सूत्र ऐरणीवर !
अहिल्यानगर – श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी या ठिकाणी एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर ब्लेडने वार केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतांना पुन्हा श्रीगोंद्यात रयत शिक्षण संस्थेच्या ‘महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालया’त शिक्षण घेण्यासाठी विद्यालयाच्या वसतिगृहात रहाणार्या २ अल्पवयीन मुलींवर एका मुलीच्या साहाय्याने दोघांनी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दोन्ही पीडितांच्या आईंच्या तक्रारीवरून सोहेल जकाते, जिशान जकाते आणि शिरापूर ता. दौंड येथील अल्पवयीन मुलगी यांच्यावर पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी ३ पैकी दोघांना कह्यात घेतले असून साहाय्य करणारी मुलगी पसार झाली आहे. पोलीस तिचा शोध घेत आहेत; मात्र या प्रकारामुळे श्रीगोंद्यात अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचे सूत्र ऐरणीवर आले आहे.
तक्रारीमध्ये म्हटले आहे की, आरोपींनी पीडितेचे अश्लील छायाचित्र काढून घडलेली घटना कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा छायाचित्र ‘व्हायरल’ करण्याची धमकी देत शरीरसुखाची मागणी करू लागले. त्या वेळी दोन्ही अल्पवयीन पीडित मुलींनी ही गोष्ट आपल्या नातेवाईकांना सांगितली. त्यानुसार आरोपींवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या वसतिगृहाची व्यवस्था पहाणारे, सुरक्षारक्षक, तसेच ‘नक्षत्र लॉजिंग’चे मालक अथवा व्यवस्थापक, तसेच सदर गुन्ह्यात साहाय्य करणारेही आरोपी होऊ शकतात, असेही पोलिसांनी सांगितले आहे.
संपादकीय भूमिका :वारंवार होणार्या बलात्कारांमध्ये धर्मांधांचा सहभाग असणे, संतापजनक आहे. अशा धर्मांधांना त्वरित कठोर शिक्षा होणे आवश्यक ! |