|
बेंगळुरू (कर्नाटक) – बेळगावमध्ये एका प्रकरणात एका महिलेला मारहाण करून नंतर तिची नग्न धिंड काढून तिला विजेच्या खांबला बांधून ठेवण्यात आले. कर्नाटक उच्च न्यायालयाने स्वतः या घटनेची नोंद घेऊन केलेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने कर्नाटक सरकार आणि पोलीस यांच्याविषयी संताप व्यक्त केला. न्यायालयाने म्हटले की, अशा घटनांनंतर देशाच्या इतर महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असेल. असा प्रकार महाभारतातही घडला नव्हता. द्रौपदीसाठी भगवान श्रीकृष्ण धावून आले होते; पण सध्याच्या आधुनिक युगामध्ये तिच्या साहाय्यासाठी कुणीही धावून आले नाही. दुर्दैवाने हे जग दुर्योधन आणि दु:शासन यांचे आहे. त्या महिलेला त्या दानवांच्या दयेवर सोडून देण्यात आले होते. कल्पना करा त्या महिलेला या सगळ्याचा किती मोठा धक्का बसला असेल. आरोपींना माणूस म्हणायची आम्हाला लाज वाटते. कुणी इतके क्रूर कसे होऊ शकते ? असा प्रश्न न्यायालयाने या वेळी विचारला.
न्यायालयाने या वेळी ‘पोलिसांना घटनास्थळी पोचण्यासाठी २ घंटे का लागले ? इतक्या हीन पद्धतीने महिलांना वागणूक मिळत असतांना पोलीस कुठे होते ?’ असे प्रश्न विचारत यासंदर्भात थेट पोलीस आयुक्तांना न्यायालयासमोर या घटनेचा सविस्तर अहवाल सादर करण्याचा आदेश दिला. तसेच ‘हे प्रकरण अत्यंत कठोरपणे हाताळले जाईल’, असेही न्यायालयाने प्रशासन आणि आरोपी यांना सांगितले.
काय आहे प्रकरण ?
बेळगावमध्ये ११ डिसेंबर या दिवशी एक तरुणी तिच्या साखरपुड्याच्या दिवशी त्याच गावात रहाणार्या तिच्या प्रियकरासमवेत पळून गेली. याचा राग तरुणीच्या कुटुंबियांना आल्यानंतर त्यांनी थेट त्या तरुणाच्या घरी धाव घेतली. त्याच्या आईला बेदम मारहाण केली, तसेच या महिलेची नग्नावस्थेच धिंड काढून तिला एका विजेच्या खांबाला २ घंटे बांधून ठेवले.
संपादकीय भूमिका
|