कुटुंबीय किंवा मित्र यांच्यासमवेत भोजन बनवून खाण्याने शरिरासह आत्माही संतुष्ट होतो ! – ‘गॅलप’ आस्थापन

विदेशी आस्थापनांच्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेतील आस्थापन ‘गॅलप’ आणि जपानचे एक खाद्यपदार्थ निमिर्ती आस्थापन यांनी केलेल्या एका अभ्यासात जे लोक कुटुंबीय किंवा मित्र यांच्यासोबत नियमित भोजन बनवून ते ग्रहण करतात, त्यांचे शरीर निरोगी रहाते अन् त्यांचा आत्माही संतुष्ट होतो. यामुळे त्यांची दिनचर्याही चांगली रहाते, असा निष्कर्ष काढला आहे. या अभ्यासासाठी ४२ देशांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले.

१. अहवालातील निष्कर्षानुसार भोजन बनवण्याचा आनंद आणि सर्वोत्तम जीवन यांच्यात सकारात्मक संबंध आहे. भोजन बनवतांना आनंदाची अनुभूती घेणार्‍यांची आयुष्यात यशस्वी होण्याची शक्यता ही ‘जेवण बनवतांना आनंद मिळाला नाही’, अशांच्या तुलनेत दीड पट अधिक आहे. तसेच जे लोक नेहमी एकत्र जेवतात त्यांचे सामाजिक संबंध अधिक भक्कम आणि आरोग्य चांगले रहाते.

२. अहवालामध्ये म्हटले आहे की, अधिक उत्पन्न असलेल्या देशांमध्ये एकट्याने जेवण्याची प्रवृत्ती वाढत आहे. एकट्याने जेवण करणारे स्वतःच्या ओळखीच्या लोकांच्या तुलनेत अल्प सामाजिक संबंध ठेवतात.

३. जगभरातील कल पहाता जे लोक आठवड्यातून ४ वेळा कुटुंबीय किंवा मित्र यांच्यासमवेत जेवतात त्यांच्यात आनंद आणि आदरयुक्त भावनांची जाणीव अधिक आहे. त्यांच्या दिनचर्येत चांगल्यारितीने आराम करणे, हसणे, काही तरी शिकणे किंवा काही रंजक करणे आदी गोष्टी जोडल्या जातात.

संपादकीय भूमिका 

हिंदु धर्मात कुटुंबव्यवस्था आहे आणि पूर्वीपासून कुटुंबातील सर्वांनी एकत्रितरित्या भोजन ग्रहण करणे, यांसारख्या गोष्टी एकत्र कुटुंबपद्धतीत होत असत. आता पाश्‍चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे अशा गोष्टी दुर्लभ झाल्या आहेत. हिंदूंनी याचा विचार करणे आवश्यक !