पुणे – राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या कार्यवाहीच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाने प्रमाणपत्र आणि पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांच्या आराखड्यात पालट केले आहेत. त्यामुळे अभ्यासक्रमाऐवजी महाविद्यालयांना बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पायाभूत अभ्यासक्रम (फाऊंडेशन), तर पदवीधरांसाठी प्रगत (ऍडव्हान्स) अभ्यासक्रम चालू करता येणार असल्यामुळे पारंपरिक पदविका अभ्यासक्रम बंद होणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यापिठाच्या अधिकार मंडळाने प्रचलित प्रमाणपत्र, प्रगत प्रमाणपत्र, पदविका आणि पदव्युत्तर पदविकांचे नामाभिधान (नोमेंक्लेचर), श्रेयांक कालावधी आदी धोरण ठरवण्यासाठी डॉ. मनोहर चासकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीच्या अहवालाअन्वये २०२४ – २५ या शैक्षणिक वर्षापासून नवीन रचना लागू करण्यास विद्यापिठाने संमती दिली आहे. त्या संदर्भातील परिपत्रकही विद्यापिठाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. विद्यापिठाचे विभाग, सर्व सलग्न महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थांनी ३० डिसेंबरपर्यंत संबंधित माहिती अद्ययावत् करावी. दिलेल्या मुदतीत माहिती अद्ययावत् न केल्यास पुढील शैक्षणिक वर्षापासून अशा अभ्यासक्रमाला संमती मिळणार नसल्याचे विद्यापिठाने स्पष्ट केले आहे.