गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्‍या जी.एस्.टी. अधिकार्‍यासह ५ जणांना अटक !

प्रतीकात्मक छायाचित्र

कोल्हापूर – गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्‍या गोल्ड लाईफ डिस्ट्रिब्युटर्स आस्थापनाच्या मुख्य आरोपीसह ९ जणांविरुद्ध १२ डिसेंबर या दिवशी राजारामपुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे, तर आस्थापनाचा प्रमोटर असलेल्या जी.एस्.टी. अधिकार्‍यांसह ५ जणांना अटक करण्यात आली आहे.

‘गुंतवणुकीच्या रकमेवर ५४ टक्के व्याज आणि २ वर्षांत मूळ रक्कम परत’, असे आमीष दाखवून गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे उघड आले आहे. चौकशीमध्ये मुख्य आरोपी इंद्रजित कदम आणि जी.एस्.टी. अधिकारी कुमार उबाळे याने ३० ते ३५ कोटी रुपयांच्या फसवणुकीची कबुली दिली असली तरी अनुमाने ३०० ते ३५० कोटी रुपयांच्या आसपास ही रक्कम असावी, अशी शक्यता अन्वेषण अधिकार्‍यांनी व्यक्त केली. कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यांसह गोवा आणि कर्नाटकातही फसवणुकीची व्याप्ती असल्याचे अन्वेषण अधिकार्‍यांनी सांगितले.