दूध वाया घालवणे योग्य ?

पशूखाद्याचे दर गगनाला भिडत असतांना दुधाचे भाव वाढवण्याच्या संदर्भात सरकार गंभीर नाही; म्हणून दूध उत्पादक रस्त्यावर दूध ओतून आंदोलने करत आहेत. दुधाला किमान ३४ रुपये दर मिळावा आणि पशूखाद्याचे भाव न्यून करण्यात यावेत, अशी त्यांची मागणी आहे. ‘खासगी आणि सहकारी दूधसंघांचे अन् दूध आस्थापनांचे प्रतिनिधी, तसेच सरकारी अधिकारी यांचा समावेश असलेल्या समितीने प्रती ३ मासांनी दूध खरेदीचे दर ठरवावेत, दूधसंघ आणि आस्थापने यांनी यानुसार दर द्यावेत’, असे दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घोषित केले होते; मात्र दूध आस्थापनांनी  दुधाचे दर आणखी उतरवले. त्यामुळे शेतकर्‍यांनी आंदोलन तीव्र केले. या प्रकरणी मंत्रालयात दूध ओतण्याची चेतावणी शेतकर्‍यांनी दिली आहे. सरकारच्या निषेधार्थ शेतकरी अनेकदा सहस्रो लिटर दूध रस्त्यावर ओततात. ‘अन्नपदार्थाची नासाडी योग्य नाही’, अशा आशयाचे पत्र एका निवृत्त न्यायमूर्तींनी मुख्य न्यायमूर्तींना लिहिले होते. त्याची नोंद घेऊन उच्च न्यायालयाने या प्रश्नी ‘स्युमोटो’ (न्यायालयाने स्वत:हून प्रविष्ट केलेली याचिका) प्रविष्ट केली. मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपिठाने ही याचिका निकाली काढली.

‘आपल्या व्यथांकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी दूध उत्पादकांनी स्वत:हूनच दूध रस्त्यांवर ओतले असेल, तर तो त्यांच्या निषेध नोंदवण्याच्या हक्काचा भाग आहे. लोकशाहीत निषेध नोंदवण्याचा हक्क संकुचित केला जाऊ शकत नाही’, असे मत त्यांनी नोंदवले. रस्त्यावर दूध ओतल्याने अन्नपदार्थाची नासाडी होते, हेही न्यायालयाने मान्य केले, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. रस्त्यावर दूध ओतून आंदोलन करणे, हा शेतकर्‍यांचा न्यायिक हक्क असला, तरी आंदोलनाचा हा एकच मार्ग आहे का ? याचाही शेतकर्‍यांनी विचार करावा. घरच्या पशूधनाला आपण लाडाने वाढवतो. त्याच्या दुधावर चरितार्थ चालतो. दूध वाया जातांना पाहून पशूंना किती वेदना होतील ? देशातील लक्षावधी कुटुंबे आज दारिद्र्यरेषेखाली आहेत. प्रतिवर्षी कुपोषणामुळे अनेक बालकांचा मृत्यू होतो, जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे कितीतरी बालकांना लहानपणी अपंगत्व येते, आजार होतात. असे असतांना दूध वाया घालवणे कितपत योग्य ? एकीकडे ‘शिवपिंडीवर दूध वाहू नका, तर ते गरिबांना दान करा !’ म्हणणारे राज्यात दूध वाया जातांना पाहून मूग गिळून गप्प बसतात, हे प्रकर्षाने लक्षात आल्यावाचून रहात नाही !

– श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई.