संपादकीय : ‘कडेकोट’ सुरक्षेचा कडेलोट !

इतिहासातून काहीच धडा न घेणे, ही आपल्या स्वातंत्र्यानंतरच्या सर्वच शासनकर्त्यांची खोड आहे. १३ डिसेंबर २००१ या दिवशी संसदेवर महंमद अफझल या जिहादी आतंकवाद्याने आक्रमण करून संसदेच्या सुरक्षेची लक्तरे वेशीवर टांगली. त्यानंतर सुरक्षा कडेकोट (?) करण्यापलीकडे आपण काहीही उपाययोजना केली नाही. परिणामी आज बरोबर २२ वर्षांनी, म्हणजे १३ डिसेंबर २०२३ या दिवशी दोघांनी नव्या संसद भवनात लोकसभेच्या ‘प्रेक्षक गॅलरी’त घुसून थेट सभागृहात उडी मारून संसदेचे कामकाज रोखण्याचा प्रयत्न केला. २२ वर्षांपूर्वी झालेल्या आक्रमणात आतंकवादी संसदेत घुसू शकले नव्हते; यंदा मात्र दोघांनी संसदेच्या आत घुसून थेट खासदारांच्या बाकांवर उड्या मारल्या. यावरून आपल्या सुरक्षेचे तीन तेरा वाजल्याचे दिसून येते. या घटनेमुळे संसदेची लाज तर गेलीच; पण जगात भारताची पुन्हा एकदा नाचक्की झाली.

१३ डिसेंबरनिमित्त संसदेत आज ‘कडेकोट’ (?) सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली होती. तरीही हे दोघेजण खासदारांकडून मिळालेल्या ‘पास’च्या आधारे संसदेत घुसले होते. याचा अर्थ ‘खासदार कुणाकुणाला ‘पास’ देतात ? कशाच्या आधारे देतात ? त्याचे निकष काय असतात ?’ यावर कुणाचाही अंकुश नसतो. घुसखोरांनी सुरक्षेतील हीच त्रुटी हेरली आणि स्वतःचे ईप्सित साध्य केले. दुसरे म्हणजे गेल्या आठवड्यात खलिस्तानी आतंकवादी गुरपवंत सिंह पन्नू याने भारतीय संसदेवर आक्रमण करण्याची धमकी दिली होती आणि आज हा प्रकार घडला. हे सुरक्षायंत्रणांचे घोर अपयश आहे. धमकी मिळूनही सुरक्षायंत्रणा इतक्या गाफील कशा रहातात ? अशा यंत्रणा जनतेचे कधीतरी रक्षण करू शकतील का ? इस्रायल-हमास युद्धात ‘मोसाद’ गाफील राहिल्याने हमासला इस्रायलवर सहजपणे आक्रमण करता आले होते. ‘यातून शिकून भारताने स्वतःच्या सुरक्षायंत्रणांची सतर्कता आणि क्षमता पडताळली होती का ?’ हा प्रश्न आहे. जशी संसदेच्या आत एक टोळी शिरली, तशी बाहेरही एक टोळी कार्यरत होती. या टोळीने हवेत पिवळ्या रंगाचा ‘गॅस’ पसरवला. विशेष म्हणजे खलिस्तानी झेंड्याचा रंगही पिवळाच आहे. त्यामुळे सकृतदर्शनी ‘या कृत्यामागे खलिस्तानवाद्यांचा हात आहे’, असे म्हणण्यास वाव आहे. कॅनडातील भारतीय उच्चायुक्तालयावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करणारेही खलिस्तानी आतंकवादीच होते, हे विसरता कामा नये. या टोळीतील एका महिलेने बाहेर ‘तानाशाही नहीं चलेगी’, अशी घोषणा दिली. अशी घोषणा आपल्याकडे विरोधी पक्षांकडून वेळोवेळी दिली गेली आहे, हे दुर्लक्षून कसे चालेल ?

आपत्कालीन प्रशिक्षण हवे !

संसदेत हा प्रकार घडल्यानंतर तेथे उपस्थितांना काय करावे ? तेच कळले नाही. सर्व जण बुचकळ्यात पडलेल्या अवस्थेत दिसून आले. अशी घटना जर विदेशात घडली असती, तर संबंधितांनी शिस्तीचे दर्शन घडवले असते. आपल्याकडे मात्र तसे चित्र निश्चितच नव्हते; कारण आपत्कालीन परिस्थितीत कसे वागावे ? याचे नागरी प्रशिक्षण देण्याची आपल्याकडे कुठलीही व्यवस्था नाही. तशी आवश्यकता आजपर्यंतच्या कुठल्याही शासनकर्त्यांना वाटली नाही. आक्रमणकर्त्यांनी ही त्रुटीही अचूकपणे हेरलेली असते. अशा त्रुटी आक्रमणकर्त्यांचे मनोबल वाढवणार्‍या असतात. देशाच्या मुख्य केंद्रातच जर अशी स्थिती असेल, तर सर्वसामान्य जनतेची काय स्थिती असेल ? याचा विचारच न केलेला बरा ! या सूत्राचा अंतर्मुख होऊन विचार करणे सोडाच; पण उलट एकमेकांवर कुरघोडीच्या राजकारणाची संधी म्हणून वापर करण्यात येत असल्याचे संतापजनक चित्र पहावयास मिळाले. ‘एक्स’ या सामाजिक माध्यमावर एका काँग्रेसी वृत्तीच्या व्यक्तीने ‘संसदेत घुसखोर घुसले, तेव्हा भाजपचे खासदार पळून जात होते, तर काँग्रेसच्या खासदारांनी पुढे येऊन धाडसाने घुसखोरांना पकडले’, असे विधान केले. ‘प्रत्येक गोष्टीचे राजकारण करणार्‍या आपल्या नेत्यांना परिस्थितीचे जरा तरी गांभीर्य आहे का ?’ असा प्रश्न पडतो. हाही पक्षीय शिस्तीचा अभावच म्हणावा लागेल.

एकीकडे संसदेत ही स्थिती असतांना संसदेच्या परिसरात काही वेगळे चित्र नव्हते. तेथे आपल्या प्रसारमाध्यमांमध्ये हे वृत्त दाखवण्याची विलक्षण चढाओढ दिसून आली. त्यामुळे संसदेत हे कृत्य करणार्‍यांची नावे, त्यांची एकूण संख्या आदी माहितीमध्ये प्रचंड विसंगती होती. अशाने प्रेक्षकांचा गोंधळ उडाला. प्रसारमाध्यमांचा असाच आक्रस्ताळेपणा मुंबईवरील २६/११ च्या आक्रमणाच्या वेळीही दिसून आला होता. याचा अर्थ ज्याप्रमाणे सुरक्षायंत्रणा वर्ष २००१ मधील घटनेतून काहीही शिकलेल्या नाहीत, त्याचप्रमाणे प्रसारमाध्यमेही मुंबईवरील २६/११ च्या आक्रमणाच्या वेळी केलेल्या पत्रकारितेतून काहीही शिकलेली नाहीत. प्रसारमाध्यमांचे हे ओंगळवाणे स्वरूप आक्रमणकर्त्यांच्या पथ्यावर पडणारे आहे. वास्तविक २६/११ नंतर सरकारनेच आपत्कालीन परिस्थितीत प्रसारमाध्यमांनी काय दाखवावे ? आणि काय दाखवू नये ? यांविषयी मार्गदर्शक तत्त्वे घालून द्यायला हवी होती. तथापि तसे झाले नाही. हे सर्व चित्र अत्यंत खेदजनक आहे.

श्रीराममंदिराविषयी तरी सतर्क रहा !

मिळालेल्या धमक्यांकडे सुरक्षायंत्रणांनी गांभीर्याने पहायला शिकले पाहिजे. १२ डिसेंबरला श्रीरामजन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांनी सुरक्षायंत्रणांना सतर्क केले आहे. त्यांनी ‘श्रीराममंदिर उभारल्यानंतरही ते उद्ध्वस्त करण्याचे ‘तुकडे तुकडे गँग’चे षड्यंत्र आहे’, अशी चेतावणी दिली आहे. ही तीच तुकडे तुकडे गँग आहे, जिने वर्ष २००१ च्या संसदेवरील आक्रमणाचा सूत्रधार महंमद अफझल याच्या फाशीच्या विरोधात ‘भारत तेरे तुकडे होंगे’, ‘अफझल हम शरमिंदा है, तेरे कातिल जिंदा है’, अशा विखारी घोषणा दिल्या होत्या. त्यामुळे या चेतावणीकडे तरी सुरक्षायंत्रणांनी दुर्लक्ष करू नये.

एकूणच संसदेतील ही घटना संसदेच्या ‘कडेकोट’ सुरक्षाव्यवस्थेचा कडेलोट करणारी आहे. जेथे संसदेच्या सुरक्षेची ही स्थिती असेल, तेथे देशात इतरत्र कशी स्थिती असेल ? याचा विचारच न केलेला बरा !

संपादकीय भूमिका 

स्वराज्याचे रक्षण कसे करावे ? याचा छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेला आदर्श भारतीय शासनकर्ते कधी अंगीकारणार ?