पुणे – हस्तलिखिते हा भारतीय ज्ञानपरंपरेचा प्राचीन आणि सर्वांत मोठा स्रोत आहे. अशा काही हस्तलिखितांचा संग्रह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या संस्कृत आणि प्राकृत विभागांमध्ये आहे. उदयपूर येथील ना नफा तत्त्वावर काम करणार्या ‘धरोहर’ संस्थेने या हस्तलिखितांची संगणकीय विवरणात्मक सूची करण्यासाठी दिलेला प्रस्ताव विद्यापीठ अधिकार मंडळाने संमत केला असून यासाठी सामंजस्य करारही केला आहे. या वेळी विद्यापिठाचे कुलगुरु प्रा. सुरेश गोसावी, ‘धरोहर’ संस्थेचे संचालक संजय सिंगल यांनी करारावर स्वाक्षरी केली.
प्राचीन ग्रंथांचे संरक्षण आणि जतन करून त्यातील माहिती पुनरुज्जीवित करून संशोधनासाठी नव्याने उपलब्ध करून देणे, ही काळाची आवश्यकता असल्याचे प्रा. गोसावी यांनी सांगितले. धरोहर संस्थेने इतर संस्थांकडे हस्तलिखितांच्या प्रतिमा मिळवून संगणकीय सूचीचे काम चालू केले आहे. यामध्ये पावणेआठ सहस्र हस्तलिखितांच्या सूची http://www.sangrah.org या आंतरजालीय संकेतस्थळावर संस्कृत अभ्यासक आणि संशोधक यांसाठी उपलब्ध असल्याची माहिती सिंगल यांनी दिली.