विश्व हिंदु परिषद, बजरंग दल आणि वारकरी संप्रदाय यांच्याकडून लोणी पोलीस ठाण्यावर मोर्चा !
ममदापूर (अहिल्यानगर) – येथे पशूवधगृहातील कसायांवर कारवाई करण्यासाठी गेलेले बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि पोलीस अधिकारी यांच्यावर काही धर्मांधांच्या जमावाकडून प्राणघातक आक्रमण करण्यात आले होते. यामधे एक तरुण आणि पोलीस अधिकारी गंभीर घायाळ झाले. त्या घटनेचा निषेधार्थ ११ नोव्हेंबर या दिवशी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि वारकरी संप्रदाय यांच्या वतीने लोणी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून लेखी निवेदन दिले. या निवेदनाद्वारे ममदापूर येथील पशूवधगृह बंद करून आक्रमणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. (अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांना ते लक्षात येत नाही का ? – संपादक)
या घटनेमधील आरोपींवर मोक्का (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात यावी. आरोपींनी पोलीस प्रशासनावरही आक्रमण केल्यामुळे आरोपींवर कारवाई करून ममदापूर येथील सर्व पशूवधगृहे कायमस्वरूपी बंद करण्यात यावीत, असे निवेदनात म्हटले आहे. ही मागणी पुढील ४ दिवसांत पूर्ण न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या प्रसंगी राष्ट्रीय वारकरी परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे संपर्क प्रमुख ह.भ.प. वेणुनाथ महाराज विखे, विश्व हिंदु परिषदेचे राहाता तालुका अध्यक्ष ह.भ.प. अमोल महाराज जगधने, बजरंग दलाचे राहाता तालुका अध्यक्ष सागर राक्षे, मातृशक्तीच्या सौ. छायाताई पेटारे, दुर्गावाहिनीच्या सौ. हिनाताई उबाळे, विश्व हिंदु परिषदेचे संयोजक राधाकिसन आहेर आदी, तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.