सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘एकदा मला परात्पर गुरुदेवांचा सत्संग लाभला. त्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी मी गुरुदेवांचे स्मरण करत असतांना ‘आजच्या सत्संगात त्यांनी मला काय काय शिकवले ?’, याचे चिंतन करत होते. त्या वेळी माझ्या डोळ्यांतून भावाश्रू वाहू लागले. माझ्या मनात ‘गुरुदेवांचे आणि माझे नाते किती आगळेवेगळे आहे !’, असा विचार येत होता. ‘आपण केवळ मायेतील नाती जाणतो; परंतु आपले जन्मोजन्मीचे नाते त्या परमात्मस्वरूप नारायणाशी जोडलेले आहे; म्हणूनच आपल्याला या जन्मी महाविष्णुस्वरूप गुरुदेव भेटले आहेत’, असे वाटून मला पुढील ओळी आपोआप सुचल्या.
भक्त-भगवंताचे नाते । कि नाते हे गुरु-शिष्याचे ।
नाते आमुचे आगळेवेगळे । प्राणाहून प्रिय गुरुदेवांचे ।। १ ।।
या नात्यात येती सर्व नाती । बंधू, सखा, माता, पिता ।
नात्यात असे दिव्य जिव्हाळा । सूक्ष्मातूनी बोलण्याचा ।। २ ।।
या नात्यात आवश्यक नाही । रक्तातीलच नाते असावे ।
हे तर आमुचे जन्मोजन्मीचे नाते । सर्व नात्यांहूनी निराळे ।। ३ ।।
या नात्यास नाव काय बरे द्यावे । सुचतच नाही या जिवास ।
जे माझे असूनही सार्यांचे वाटे ।
आणि सार्यांचे असूनही केवळ माझेच वाटे ।। ४ ।।
– कु. अपाला औंधकर (आताचे वय १६ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (१५.६.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |