स्विडनमध्ये आता लोकांना ‘टॅब्लेट’, संगणक आदी तांत्रिक आणि ‘डिजिटल’ उपकरणांचा कंटाळा आल्यामुळे मुलांचे डिजिटल शिक्षण बंद होण्याच्या मार्गावर आहे. याऐवजी आता पुन्हा वही आणि पेन, म्हणजे लिहिण्याला प्रोत्साहन देण्यासाठी याच शैक्षणिक सत्रापासून प्रारंभ झाला आहे. आता स्वीडनमधील सर्व प्राथमिक शाळा मुलांना ‘टॅब्लेट’ऐवजी लिहिण्याचा सराव करण्यावर भर देत आहेत.
टॅब्लेट आणि डिजिटल उपकरणांमुळे मुलांचे मूलभूत कौशल्य झाले आहे पुष्कळ न्यून !
हे पालट तज्ञांच्या सल्ल्यानुसार होत आहेत. शिकण्याची जुनी पद्धतच योग्य असल्याचे शैक्षणिक तज्ञांचे मत आहे; कारण शिशुवर्गात टॅब्लेट आणि डिजिटल उपकरणांमुळे मुलांचे मूलभूत कौशल्य पुष्कळच न्यून झाले आहे. स्वीडनच्या शिक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, आम्ही ६ वर्षांपेक्षा अल्प वयाच्या मुलांना डिजिटल शिक्षण देणे पूर्णपणे बंद करत आहोत.
लहान मुलांसाठी डिजिटल शिक्षण पूर्णपणे बंद करण्याचा स्विडनचा निर्णय
स्विडनची शैक्षणिक गुणवत्ता युरोपियन देशांच्या तुलनेत उच्च दर्जाची आहे; परंतु चौथ्या इयत्तापर्यंतच्या मुलांची शिकण्याची पातळी वर्ष २०१६ ते २०२१ या ५ वर्षांत पुष्कळच घसरली आहे. यामुळे पुन्हा पारंपरिक पद्धतीचे शिक्षण चालू करून लहान मुलांसाठी डिजिटल शिक्षण पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय स्विडनच्या शिक्षण मंत्रालयाने घेतला आहे. टॅब्लेटचा वापर चालू झाल्यामुळे लहान मुलांचे लिहिणे बंदच झाले आहे. यामुळे त्यांची हानी होत आहे. स्विडनला सुचलेले हे शहाणपण जगाला कधी सुचणार ?
(लहान मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे देण्यासाठी अट्टहास करणारे कथित बुद्धीप्रामाण्यवादी याविषयी काही बोलणार का ? – संपादक)