आज ११.१२.२०२३ या दिवशी ‘संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीदिन’ आहे. त्या निमित्ताने…
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची संजीवन समाधी ही जागृत असून ते आजही प्रचीती देतात. प्रत्येक भक्ताचा जसा भाव असेल, तसे ज्ञानदेव अनुभवाला येतात. त्या समाधी स्थानाची स्पंदने अफाट आणि अलौकिक अशी आहेत. प्रतिवर्षी हा समाधी सोहळा लाखो वारकरी मोठ्या भक्तीभावाने साजरा करतात. स्वतःचा संसारताप विसरून संतश्रेष्ठ ज्ञानदेवांना भावाश्रूंचा अभिषेक करतात. ते मौलिक आणि अमूल्य भावाश्रू संत ज्ञानेश्वरांना भावतात. ते माऊली होऊन आपल्या लेकरांना सांभाळतात. लौकिकातील माय ही जन्मदात्री, तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमाऊली ही विश्वाची माऊली ! ती आपल्या लेकरांच्या प्रगतीसाठी सदैव हात पुढे करते.
१. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याचा स्वानुभव
सुमारे ७२७ वर्षांपूर्वी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतली. ७ शतके उलटून गेली, तरी हा समाधी सोहळा वारकरी आणि भक्त यांच्या अंत:करणाच्या पटलावरून पुसला गेला नाही. त्याचा अमीट ठसा उमटला. सहस्रो घराण्यात परंपरेतून आळंदी वारी चालत आली आणि आजही चालू आहे. लाखो वारकरी माऊलींच्या समाधी दर्शनासाठी राज्यभरातून येतात. संत ज्ञानेश्वर माऊलींचा जयघोष होऊन अवघी अलंकापुरी इंद्रायणी नदी अंतर्बाह्य थरारते. पंढरीचा पांडुरंगही माऊलींच्या दर्शनासाठी येतो. त्याला ज्ञानेश्वरांना भेटल्याविना चैन पडत नाही. या पालखी सोहळ्यात २६ दिंड्या सहभागी होतात. कार्तिक कृष्ण त्रयोदशीला संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी सोहळ्यात सुखाचा स्वानुभव घेण्यासाठी लाखो भाविकांची पावले आळंदीकडे वळतात. विविध धार्मिक कार्यक्रम होतात. सगळ्यात भावपूर्ण कार्यक्रम, म्हणजे ‘समाधीच्या अभंगांचे गायन!’ पिढ्यान्पिढ्या घराण्यामध्ये ‘समाधी अभंग’ म्हणण्याचा मान चालत आलेला आहे. वेगवेगळे फडकरी आणि दिंड्या यांच्याकडे हा ‘समाधी अभंग’ उभे राहून गायन करण्याचा मान आहे. माऊलींच्या संजीवन समाधीचे साधारणपणे ७० अभंग आहेत. हे संत नामदेव महाराजांच्या स्फुरणामधून साकारलेले अभंग आहेत.
२. संत नामदेव महाराज यांनी अलंकापुरीच्या वैशिष्ट्यांचे केलेले वर्णन
संत नामदेव महाराजांच्या प्रारंभीच्या अभंगात समाधीची पूर्वपीठिका व्यक्त झाली आहे. ते म्हणतात,
महा उत्सव त्रयोदशी । केली त्या ज्ञानदेवासी ।
मग नामा म्हणे विठोबासी । चरण धरूनियां ।।
समाधिसुख दिधलें देवा । ज्ञानांजन आळंकापुरी ठेवा ।
अजानवृक्षी बीज वोल्हावा । या ज्ञानंजनासी ।।
कृपा आली विठ्ठलासी । म्हणे ज्ञानदेवा परियेसी ।।
तीर्थ भागीरथी अहर्निशीं । तुज नित्य स्नानासि दिधलीसे ।।
इंद्रायणी दक्षिणवाहिनी । भागीरथी मणिकर्णिका दोन्ही ।
इया मिळालीया त्रिसंगमीं । पुण्यभूमिं तुझिये ।।
भावार्थ : कार्तिक त्रयोदशीच्या शुभदिवशी साधा उत्सव नाही, तर महाउत्सव केला. संत ज्ञानदेवांना विठ्ठलाने परमात्मा परमेश्वराने समाधी सुखाचा सुरेख अनुभव दिला. अलंकापुरी पुण्यभूमीमध्ये हा महाउत्सव संपन्न झाला. अजानवृक्षातळी ज्ञानदेवांवर श्रीविठ्ठलाने कृपा केली. ही कृपा अत्यंत आगळीवेगळी असून तिचे वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात. भागीरथी तीर्थ कायम जवळ ठेवून नित्य स्नानासाठी इंद्रायणी ही दक्षिणवाहिनी नदी दिली. अलंकापुरीच्या वैशिष्ट्यांचे वर्णन करणारा वरील अभंग आहे.
३. संजीवन समाधीच्या वेळी सद्गुरु निवृत्तीनाथ यांची झालेली स्थिती
संत नामदेव महाराज वर्णन करतात,
वोसंडोनि निवृत्ती आलिंगों लागला ।
आणिकांच्या डोळां अश्रु येती ।।
अमर्यादा कधी केली नाहीं येणें ।
शिष्य गुरूपण सिद्धी नेलें ।।
गीतार्थाचा अवघा घेतला सोहळा ।
गुह्यगौप्यमाळा लेवविल्या ।।
फेडिलीं डोळ्याचीं अत्यंत पारणीं ।
आता ऐसें कोणी सखे नाहीं ।।
काढोनिया गुह्य वेद केले फोल ।
आठवती बोल मनामाजीं ।।
नामा म्हणे संत कासावीस सारे ।
लाविती पदर डोळियांसी ।।
भावार्थ : वैराग्याचा मेरूमणी असलेले संत ज्ञानदेवांचे सद्गुरु निवृत्तीनाथ यांची स्थिती कशी झाली ? ते या अभंगातून लक्षात येते. त्यांच्या नयनांमधून अश्रूंच्या धारा बरसू लागल्या. संत ज्ञानदेवांचे गुणवर्णन करून आणि ते आठवून त्यांना गहिवरून आले. भावना अनावर झाल्या. अत्यंत विनम्र मर्यादांचे उल्लंघन न करणारा असा अलौकिक शिष्य असलेल्या संत ज्ञानदेवांनी ‘ज्ञानेश्वरी’ लिहून गीतेमधील गुह्याची उकल केली. अशा संत ज्ञानदेवांना सद्गुरु निवृत्तीनाथ वारंवार आलिंगन देऊ लागले. ‘आपल्या शिष्याच्या संजीवन समाधी सोहळ्यामुळे विरह होणार’, या विचारामुळे ते व्याकुळ झाले. हे दृश्य पाहून तेथे उपस्थित सर्वच संतांच्या डोळ्यांत पाणी आले.
४. प्रत्यक्ष पांडुरंगाने समाधी सोहळ्याचे केलेले वर्णन
अशा या अवघड वेळी स्वत: पांडुरंग सकल संतांना सांगतात,
देव म्हणे ऐसे आठवाल कोठवर । होईल उशीर समाधीशी ।।
भावार्थ : तुम्ही सगळे जण संत ज्ञानदेवांच्या वेगवेगळ्या आठवणी सांगाल, प्रसंग आठवाल, तर समाधी सोहळ्याला फार उशीर होईल. संत सोपानदेव, संत मुक्ताबाई, अशा अनेक संतांना ज्ञानदेवांना दूर करावेसे वाटेना. ज्ञानदेव मोठे भाग्यवान ! चारही भावंडांचे मूळ रूप किंवा अवतार सांगण्याची विनंती त्यांनी विठ्ठलाला केली. कोणतीही उपाधी नसलेले संत ज्ञानदेव समाधी घेण्यास परिपूर्ण आहेत.
५. समाधी सोहळ्याच्या तपशीलाचे वर्णन करणारा संत नामदेवांचा अभंग
नेत्रांसमोर समाधी सोहळयाचे दृश्य साकार करणारा संत नामदेवांचा अभंग आहे. ते म्हणतात,
निवृत्तींने बाहेर आणिलें गोपाळ ।
घातियेली शिळा समाधीसी ।।
सोपान मुक्ताई सांडिती शरीरा ।
म्हणती धरा धरा निवृत्तीसी ।।
आणिकांची तेथे उद्विग्न तीं मनें ।
घलिताती सुमनें समाधीसी ।।
नामदेवें भावें केली असे पूजा ।
बापा ज्ञानराजा पुण्यपुरुषा ।।
भावार्थ : अवघड असा समाधीचा क्षण आला. संत निवृत्तीनाथांनी गोपाळाला संत ज्ञानदेवांच्या भुयारामधून बाहेर आणले. समाधीच्या स्थानी शिळा ठेवून स्थान बंद केले. संत सोपान, संत मुक्ताई आणि सद्गुरु निवृत्ती यांना शोक अनावर झाला. अनेक संतांनी उद्विग्न मनांनी संत ज्ञानदेवांच्या समाधीवर फुले अर्पण केली. संत नामदेवांनी अत्यंत मनोभावे पुण्यपुरुषाच्या, म्हणजेच ज्ञानराजांच्या समाधीचे पूजन केले.
प्रत्येक अभंग म्हणता म्हणता भक्तांचा कंठ दाटून येणे, हे स्वाभाविक आहे. संजीवन समाधी ही जागृत असून ज्ञानदेव आजही प्रचिती देतात.
अवघी जयजयकारे पिटियेली टाळी । उठली मंडळी वैष्णवांची ।।
सह मंडळी सारे उठले ऋषिश्वर । केला नमस्कार समाधीशी ।।
भावार्थ : सर्वांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा जयजयकार केला आणि जमलेले सर्व वैष्णव अन् ऋषितुल्य संतमंडळी यांनी समाधीला वंदन केले.
– कौमुदी गोडबोले
(साभार : दैनिक ‘मुंबई तरुण भारत’)