खरे सुख भगवंताच्या नामात आहे ! – बालकीर्तनकार ह.भ.प. (कु.) ईश्वरीताई येसरे

कादवड (ता. चिपळूण) येथे श्री कालभैरव मंदिरात जन्मोत्सवानिमित्त कीर्तन

बालकीर्तनकार ह.भ.प. (कु.) ईश्वरीताई येसरे

चिपळूण, ९ डिसेंबर (वार्ता.) – आपला जन्म कशासाठी झाला आहे ? याचा विचार मनुष्य करत नाही. कलियुगामध्ये प्रत्येक जण प्रपंचामध्ये गुंतला आहे. प्रपंच मुळी दुःखमय आहे. त्यात किती  गुंतायचे ते ठरवले पाहिजे. आपला जन्म परमार्थ साधण्यासाठी झाला आहे. भगवंताने एवढे चांगले जीवन दिले आहे, तर त्याची भक्ती करा.

सुख प्रत्येकाला हवे असते; मात्र सतत टिकणारे सुख कशात आहे ? हे त्याला समजत नाही. आपल्याला सुखी व्हायचे असेल, तर देवाला आपलेसे करून घ्यावे लागेल. खरे सुख भगवंताच्या नामात अन् चिंतनात आहे, असे प्रतिपादन खेड तालुक्यातील कळंबणी येथील बालकीर्तनकार ह.भ.प. (कु.) ईश्वरीताई अविनाश येसरे यांनी श्री कालभैरव मंदिरात आयोजित कीर्तनात केले.

या वेळी त्यांनी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या ‘आपुला तो एक देव करूनी घ्यावा । तेरे विना जीवा सुख नाही ।।’ या अभंगावर निरूपण केले. या भावपूर्ण कीर्तनाचा लाभ ग्रामस्थांनी घेतला.