देवळात दर्शनाला जाण्यापूर्वी करावयाच्या कृती !

देवळात प्रवेश करण्यापूर्वी करावयाच्या कृती

१. आपल्या अंगावरील चामड्याच्या वस्तू काढून ठेवाव्यात.

२. देवळाच्या आवारात चपला वा जोडे घालून जाऊ नयेत, तर देवालयक्षेत्राच्या बाहेरच काढावेत. हे अशक्य असल्यास किंवा देऊळ रस्त्यावर असल्यास देवाची क्षमा मागून देवळात प्रवेश करावा. देवालयाच्या आवारात वा देवळाबाहेर चपला वा जोडे काढावे लागत असल्यास ते देवाच्या उजव्या कडेस काढावेत.

३. पाय धुण्याची सोय असल्यास पाय धुवावेत.

४. पाय धुतल्यावर हातात पाणी घेऊन ‘पुंडरिकाक्षाय नम: ।’ हे तीनदा उच्चारून स्वतःच्या सर्वांगावर तीनदा पाणी शिंपडावे.

५. गळ्याभोवती कोणतेही वस्त्र लपेटू नये.

६. एखाद्या देवळात प्रवेश करण्यापूर्वी पुरुषांनी अंगरखा (शर्ट) काढून ठेवण्याची पद्धत असल्यास त्या पद्धतीचे पालन करावे.

७. देवळात दर्शनाला जातांना सर्वसाधारण पुरुष-भाविकांनी डोक्यावर टोपी घालावी किंवा डोक्याला पवित्र वस्त्र बांधावे, तर स्त्री-भाविकांनी डोक्यावरून पदर घ्यावा. या संदर्भात स्थानिक परंपरेनुसार करावे.

८. देवळाचे प्रवेशद्वार आणि गरुडध्वज यांना नमस्कार करावा.

देवळाच्या कळसाचे दर्शन घेणे आणि कळसाला नमस्कार करणे

देवळाच्या आवारात आल्यावर तेथून देवळाच्या कळसाचे दर्शन घ्यावे आणि कळसाला नमस्कार करावा.

ओळीत (रांगेत) असतांना पुढे-मागे असणार्‍या लोकांशी बोलणे टाळणे

देवळात दाटी (गर्दी) असल्यास ओळीत दर्शन घ्यावे. देवतेच्या दर्शनासाठी जातांना नामजप करत रहावे. त्यामुळे सत्त्वगुण पुष्कळ प्रमाणात मिळतो. ओळीत उभे असतांना पुढे-मागे असणार्‍या लोकांशी बोलणे टाळावे.

देवळाच्या आवारातून सभामंडपाकडे जाण्यास निघणे

आवारातून सभामंडपाकडे जातांना हात नमस्काराच्या मुद्रेत ठेवावेत. (दोन्ही हात जोडून ते अनाहतचक्राच्या ठिकाणी शरिरापासून काही अंतरावर ठेवावेत.) ‘गुरु किंवा देवता यांना भेटण्यास जात आहोत’, असा भाव ठेवावा. ‘आपले गुरु किंवा देवता आपल्याकडे पहात आहेत’, असाही भाव ठेवावा.

(संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘देवळात दर्शन कसे घ्यावे)