भाविक, भक्त आणि मंदिर यांसाठी कार्यतत्पर रहाण्याचा श्री सिद्धिविनायक गणपति मंदिर न्यास समितीचे अध्यक्ष अन् आमदार सदा सरवणकर यांचा निर्धार !

प्रभादेवी (मुंबई) येथील स्वयंभू आणि जागृत देवस्थान असणार्‍या श्री सिद्धिविनायक गणपति मंदिर न्यास समितीच्या अध्यक्षपदी नुकतीच महाराष्ट्र शासनाने आमदार श्री. सदा सरवणकर यांची नियुक्ती केली. देवस्थानच्या अध्यक्षपदाची धुरा हाती येताच मंदिर, मंदिरात येणारे भाविक यांदृष्टीने नवनियुक्त अध्यक्ष कोणत्या प्रकारे कार्यक्रम राबवणार आहेत, याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’कडून आमदार श्री. सदा सरवणकर यांची विशेष मुलाखत घेण्यात आली. श्री सिद्धिविनायक गणपति मंदिर न्यास मंदिराच्या अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळतांना नेमक्या कशा पद्धतीने कार्य करणार, हे आमदार श्री. सदा सरवणकर यांच्याच शब्दांत लेखाद्वारे देत आहोत !

श्री सिद्धिविनायक गणपति मंदिर

भाविकांच्या अडचणी समजून घेतल्या !

साधारणतः ४० वर्षांपासून मी श्री सिद्धिविनायक मंदिर परिसरात शिवसेनेच्या माध्यमातून माननीय शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने काम करत आहे. हे काम करतांना मंदिरात येणार्‍या भक्तगणांना मी अतिशय जवळून पाहिले आहे. अत्यंत श्रद्धेने येणार्‍या भक्तीमार्गातील या जनसमुदायाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. दर्शन घेतल्यानंतर प्रसन्न मनाने ते जात होते; पण दर्शन घेईपर्यंत त्यांना अडचणी येत होत्या. त्या अडचणी मी बर्‍यापैकी समजून घेतलेल्या आहेत.

भक्तगणांसाठी ‘मिनी बस’ चालू करणार !

माझे पहिले उद्दिष्ट हेच असेल की जे भक्तगण देश-विदेशातून दर्शनासाठी येतात त्यांना श्री सिद्धीविनायकाचे दर्शन अतिशय शांत आणि प्रसन्न मनाने घेता आले पाहिजे. श्री गणेशाच्या दर्शनाने त्यांचे समाधान झाले पाहिजे. दर्शनाला येणार्‍या भक्तांच्या अडचणींवर मात करणे, त्यांना सोयी-सुविधा देणे या गोष्टी प्रामुख्याने करण्याचा आमचा प्रयत्न आहे, उदा. मंगळवार, शनिवार, रविवार या दिवशी मंदिरात अत्यंत गर्दी असते. या वेळी दादर आणि प्रभादेवी रेल्वेस्थानकांवरून येणार्‍या भक्तगणांची असुविधा होते. या सर्वांसाठी ‘मिनी बस’ चालू करून त्यांचा प्रवास सुखद करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.

मंदिराची रेंगाळलेली कामे तातडीने पूर्ण करू !

आमदार सदा सरवणकर

दर्शनासाठी उन्हात रांगेत उभे रहाणार्‍या भाविकांना सोयीसुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करू. स्वच्छतागृहे, शौचालये, तसेच अन्यही अनेक अत्यावश्यक सुविधा पुरवण्यासाठी आम्ही तातडीने प्रारंभ केला आहे. रांगेतून दर्शन घेईपर्यंत पुन:श्च माघारी जाण्यापर्यंत आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवण्याचा प्रयत्न आम्ही करू. त्यानंतर मंदिराच्या दुरुस्तीच्या कामाला प्राधान्य देऊ. रेंगाळलेली कामे तातडीने पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहील. ‘हे सर्व मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने आम्ही करू’, अशी मला आशा आहे.

मंदिरातील भ्रष्टाचाराच्या आरोपांचा अहवाल शासनाकडे सादर !

श्री सिद्धिविनायक मंदिरातील भ्रष्टाचाराच्या आरोपांविषयी आम्ही शासनाचे लक्ष वेधले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे. या अहवालाचा अभ्यास होईल आणि ज्यांनी चुका केल्या असतील, त्यांना योग्य ती शिक्षा होईल.

गरजवंतांनाच साहाय्य होते का, याची निश्चिती करू !

श्री सिद्धिविनायक मंदिराच्या न्यासाच्या माध्यमातून सर्व जातीधर्माच्या लोकांना साहाय्य केले जाते. जो गरजवंत आहे. त्यालाच साहाय्य केले जात आहे ना ? याची निश्चिती करून योग्य त्या व्यक्तीलाच साहाय्य देण्याचा आम्ही प्रयत्न करू. गणरायावरील श्रद्धेपोटी काही सेवेकरी वर्षानुवर्षे येथे विनामूल्य सेवा करत आहेत. कोरोनाच्या कालावधीमध्ये हे सगळे बंद करण्यात आले होते. आम्ही काही दिवसांतच याविषयी पूर्ण अभ्यास करून योग्य नियोजन करून सेवेकर्‍यांची व्यवस्था केली.

अन्य मंदिरांसाठीही सिद्धिविनायक न्यास आवश्यक साहाय्य करेल !

एखाद्या कुटुंबातील कुटुंबप्रमुख संपूर्ण कुटुंब सांभाळतो, तसाच हा भाग आहे. महाराष्ट्रातील वारकरी आणि आपण सर्वजण देवाला मानणारी मंडळी आहोत. जागोजागी लहान-मोठी मंदिरे आहेत. प्रत्येक देवाचे निरनिराळे भक्त आहेत; मात्र या सगळ्यांसाठी कुणीतरी नेतृत्व करायला हवे आणि पुढाकार घेऊन सिद्धिविनायक न्यास सर्वांना साहाय्य करेल, याचे आश्वासन मी देतो. सर्व हिंदु देवीदेवतांच्या मंदिरांसाठी आवश्यक असलेले सर्व साहाय्य सिद्धिविनायक न्यास करेल.