विवाहविधीचे पाश्चात्त्यीकरण रोखा !

प्रतिकात्मक छायाचित्र

अमेठी जिल्ह्यातील (उत्तरप्रदेश) जगदीशपूर येथे लग्न समारंभात ‘डीजे’ वाजवल्यामुळे मुसलमान तरुणाचा निकाह सोहळा पार पाडण्यासाठी आलेल्या मौलानाने वधू-वरांचा निकाह करण्यास नकार दिला. त्यांनी डीजे वाजवतांना पाहून अप्रसन्नता व्यक्त करत ‘हे इस्लामिक रितीरिवाजांच्या विरोधात आहे’, असे सांगितले. हे वाचून हिंदु धर्मियांना आणि हिंदू समाजातील प्रत्येक घटकाला किती सखोल आत्मपरीक्षणाची आवश्यकता आहे, हे लक्षात आले असेल ! सध्या अनेक हिंदू विवाह समारंभांमध्ये पाश्चात्त्यांप्रमाणे केक कापणे, पाश्चात्त्य संगीतावर विक्षिप्त अंगविक्षेप करत नृत्य करणे, वरात विलंबाने आणणे, विवाह मुहूर्त जवळ आल्यानंतर वरमाला घालतांना वर किंवा वधू यांना वर उचलून धरणे या सर्व प्रकारांमुळे मुहूर्ताची वेळ टळते. विवाह समारंभात सप्तपदी होतांना वधूला प्रत्येक फेरीला भेटवस्तू दिल्या जातात.

हे सर्व चुकीचे प्रकार पुरोहितांसमक्ष घडतात; परंतु ते हे अपप्रकार थांबवण्यासाठी प्रयत्न करतांना दिसत नाहीत, हे दुर्दैवी आहे. त्यांना शास्त्रानुसार, तसेच वेळेत विवाह विधी करण्याचे महत्त्व समाज बांधवांना पटवून द्यावेसे वाटत नाही, हे तेही व्यावसायिक झाल्याचे लक्षण आहे. धर्माच्या संदर्भात चुकीचे काही घडत असल्यास ते थांबवण्याची इच्छा, तसेच धारिष्ट्य त्यांच्यात का नाही ? धार्मिक विधी आणि पूजा पाठ करणार्‍या पुरोहितांमध्येच जर धर्माने सांगितलेल्या प्रत्येक विधींविषयी आदर, तसेच अभिमानाचा अभाव असेल, तर सामान्य, तसेच तरुण पिढी यांच्यामध्ये तो कसा निर्माण होईल ? नवीन पिढीला शास्त्रानुसार योग्य नि अयोग्य काय ? हे कोण शिकवणार ? योग्य वेळी अयोग्य कृती थांबवल्यास समाजाची होणारी अपरिमित हानी रोखणे शक्य होते. विवाहासारख्या धार्मिक विधींमध्ये नव्याने निर्माण होणार्‍या रुढी थांबवल्या जाऊ शकतात. असे असतांना धर्महानी रोखण्याची तळमळ, जिद्द अल्प का आहे ? याविषयी विचारमंथन होणे आवश्यक आहे. हिंदूंमध्ये प्रचंड प्रमाणात असलेला धर्माभिमानाचा अभाव, धार्मिक सूत्रांविषयी असलेली असंवेदनशीलता त्यांच्या मनामध्ये धर्माविषयी प्रेम आणि आदर निर्माण न होण्यास कारणीभूत आहे. पौरोहित्य हे केवळ उपजीविकेचे साधन नसून धर्माचरण, धर्मपालन आहे आणि पर्यायाने ईश्वरप्राप्तीचे साधन आहे, हे लक्षात घेऊन पुरोहितांनीही ही धर्महानी रोखावी !

– श्रीमती धनश्री देशपांडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.