व्यावसायिक हिरानंदानी यांच्याकडून पैसे घेऊन लोकसभेत प्रश्न विचारल्याचा आरोप
नवी देहली – तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांना लोकसभेतून बडतर्फ करण्यात आले आहे. पैसे घेऊन लोकसभेत प्रश्न (कॅश फॉर क्वेरी) विचारण्याच्या प्रकरणी नैतिकता समितीचा अहवाल लोकसभेत मांडण्यात आला होता. यात समितीने मोईत्रा यांना बडतर्फ करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर २ घंट्यांतच मोईत्रा यांना बडतर्फ करण्यात आले. ‘मोईत्रा यांनी लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी बांधकाम व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांच्याकडून रोख रक्कम आणि महागड्या भेटवस्तू घेतल्या होत्या’, असा आरोप ठेवण्यात आला होता. याखेरीज मोईत्रा यांनी हिरानंदानी यांना संसदेकडून दिले जाणारा संगणकीय ‘लॉग-इन आयडी’ आणि ‘पासवर्ड’ दिला होता. त्यावरून हिरानंदानी यांनी अदानी समूहाच्या संदर्भात प्रश्न विचारले होते. या संदर्भात भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी मोईत्रा यांनी लाच घेतल्याची तक्रार लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून केली होती. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी हे प्रकरण नैतिकता समितीकडे सोपवले होते.
सौजन्य टाइम्स नाऊ
१. बडतर्फ केल्यानंतर लोकसभेच्या बाहेर महुआ मोईत्रा म्हणाल्या की, दर्शन हिरानंदानी यांनी पैसे दिल्याचे कोणतेही पुरावे समितीने दिलेले नाहीत. याखेरीज हिरानंदानी यांना जबाब नोंदवण्यासाठीही समितीने बोलावले नाही. मी भेटवस्तू स्वीकारल्या याचेही कोणते पुरावे समितीकडे नाहीत. मी केवळ माझा लॉग-इन-आयडी शेअर केला, एवढीच तक्रार माझ्याविरोधात केली गेली. त्यावरून आज मला बडतर्फ केले.
२. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, खासदार म्हणून महुआ मोईत्रा यांचे वर्तन अनैतिक आणि असभ्य होते. त्यामुळे त्यांना खासदार या पदावर ठेवता येणार नाही.
संपादकीय भूमिकातृणमूल काँग्रेसमध्ये धर्मांध, जनताद्रोही आणि भ्रष्ट राजकारण्यांचा भरणा आहे, हे वेळोवेळी समोर आले आहे. असा पक्ष हा लोकशाहीला लागलेला कलंक होय ! |