Garba UNESCO : गुजरातच्या गरब्याला ‘युनेस्को’च्या ‘अमूर्त सांस्कृतिक वारसा’ सूचीत स्थान !

कर्णावती (गुजरात) – गुजरातमधील जगप्रसिद्ध धार्मिक नृत्य असलेल्या गरब्याला संयुक्त राष्ट्रांच्या ‘युनेस्को’ संस्थेने ‘अमूर्त सांस्कृतिक वारसा’ सूचीत समाविष्ट केले आहे. केंद्रीय संस्कृती मंत्री जी. किशन रेड्डी यांनी या निर्णयाची माहिती त्यांच्या ‘एक्स’ खात्यावरून दिली. यात त्यांनी म्हटले की, माता अंबेच्या आराधनेशी संबंधित गरबा आयोजन गुजरात राज्याच्या संस्कृतीला अभिव्यक्त करते.

संयुक्त राष्ट्रे शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना, म्हणजेच ‘युनेस्को’ने आतापर्यंत भारतातील १५ सांस्कृतिक परंपरांचा या सूचीत समावेश केला आहे. यांत रामलीला, योगासने, वैदिक मंत्रजप, केरळमधील ‘कुटियाट्टम्’ पारंपरिक रंगभूमी, राजस्थानमधील ‘कालबेलिया’ हा लोकसंगीत आणि नृत्यप्रकार, लडाखमधील बौद्ध जप,  कोलकात्यातील दुर्गापूजा, कुंभमेळा आदींचा यात समावेश आहे.

गरब्याचा या सूचीत समावेश होण्यासाठी ‘महाराज सयाजीराव विद्यापिठा’चे विशेष योगदान असल्याचे सांगण्यात आले.