Goa Minor Rapes : अल्पवयीन मुलींवरील बलात्काराची प्रकरणे गोव्यात सर्वाधिक !  ‘राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागा’चा अहवाल

‘राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागा’चा अहवाल

पणजी, ५ डिसेंबर (वार्ता.) : वर्ष २०२२ मध्ये अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या घटनांचे प्रमाण गोव्यात सर्वाधिक असल्याची माहिती ‘राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागा’ने त्यांच्या अहवालात प्रसिद्ध केली आहे.

‘राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागा’च्या अहवालात म्हटले आहे की, गोव्यात वर्ष २०२२ मध्ये बलात्काराच्या ७५ घटना नोंद झाल्या आहेत आणि यापैकी ५७ पीडित या १८ वर्षांपेक्षा अल्प वयाच्या मुली होत्या. ५७ पीडितांपैकी २ पीडित ६ वर्षांखालील, १२ पीडित ६ ते १२ वर्षे वयोगटातील, २६ पीडित १२ ते १६ वर्षे वयोगटातील आणि १७ जणी १६ ते १८ वर्षे वयोगटातील आहेत. गोव्यात बलात्काराच्या एकूण घटनांपैकी ७६ टक्के घटना या अल्पवयीन मुलींशी संबंधित आहेत. ७५ घटनांमध्ये ९३.१ टक्के प्रकरणांत आरोपी पीडितेच्या ओळखीचा होता. वर्ष २०२२ मध्ये गोव्यात महिलांवरील अत्याचाराच्या ९० घटना घडल्या आहेत. गोव्यात वर्ष २०२२ मध्ये महिलांच्या विरोधात ३२ सायबर गुन्हे घडले, तर यांपैकी ४ गुन्हे ‘पोर्नोग्राफी’शी (अश्‍लीलतेशी) निगडित होते.