भूमी बळकावल्याच्या प्रकरणानंतर आता नवीन घोटाळा
पणजी, ५ डिसेंबर (वार्ता.) : गोव्यात बनावट कागदपत्रे सिद्ध करून भूमी बळकावल्याच्या घटना उघडकीस आल्यानंतर आता जन्मदाखल्यातील माहिती चोरून बनावट पारपत्र बनवण्याचा घोटाळा उघडकीस आला आहे. कर्णावती (गुजरात) येथील एका महिलेला बनावट पोर्तुगीज पारपत्र बाळगल्याच्या प्रकरणी कह्यात घेण्यात आल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला आहे.
(सौजन्य : Prudent Media Goa)
गोव्यातील नागरिकांना पोर्तुगीज नागरिकत्व सहजरित्या मिळते. याचा अपलाभ उठवत गोव्यातील बाहेरील काही लोक बनावट पोर्तुगीज पारपत्र सिद्ध करून युरोपमध्ये गलेलठ्ठ वेतनाच्या नोकरीसाठी किंवा व्यवसायासाठी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. दलाल आणि सरकारी खात्यातील कर्मचारी यांच्या संगनमताने गोमंतकियांच्या जन्मदाखल्यातील माहिती चोरण्यात येत आहे. या चोरलेल्या माहितीच्या आधारे बनावट पारपत्र सिद्ध केले जाते. दलाल १ बनावट पारपत्र बनवण्यासाठी सुमारे ५-६ लाख रुपये घेत आहेत. कर्णावती येथील महिलेला कह्यात घेतल्यानंतर बनावट पारपत्र बनवण्याच्या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याचे सिद्ध झाले आहे. वस्तूतः हा घोटाळा पूर्वीपासून चालू आहे; मात्र लिस्बन, पोर्तुगाल येथील अधिकार्यांना गोमंतकियांची जन्मदाखल्यातील माहिती चोरून बनावट पारपत्र बनवण्याचे एक मोठे जाळे असल्याची माहिती मागील ६ मासांत मिळाल्यावर संबंधितांवर कारवाई होण्यास प्रारंभ झाला आहे. या घोटाळ्याचा अनेक गोमंतकियांना आतापर्यंत फटका बसला आहे.