निसर्गाला संपवून माणूस सुखी होणार नाही ! – प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी महाराज

कणेरी मठाचे प.पू. काडसिद्धेश्वर महाराज

सातारा, ५ डिसेंबर (वार्ता.) – भगवंताने सुंदर सृष्टी निर्माण केली आहे. प्रत्येक जीव निसर्गाच्या सान्निध्यात जन्माला येऊन लहानाचा मोठा होतो. झाडे, पशू आणि पक्षी स्वत:साठी जगत नाहीत; उलट ती माणसाला जगवतात. झाडे फुले देतात, फळे देतात; परंतु माणूस स्वत:च्या स्वार्थासाठी सुंदर सृष्टीचा नाश करत आहे. निसर्गाला संपवून माणूस सुखी होणार नाही, असे प्रतिपादन प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी महाराज यांनी केले. रहिमतपूर येथील काडसिद्धेश्वर संप्रदाय पंचक्रोशी गुरुभक्त मंडळ यांच्या वतीने गांधी चौक येथे आयोजित आध्यात्मिक प्रवचनात ते बोलत होते. या वेळी सहस्रो भाविक उपस्थित होते.

प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी महाराज म्हणाले, ‘‘माणूस बुद्धीमान आहे. तो नित्य नवे शिकत असतो; मात्र जीवन जगण्याची खरी कला माणसाला अवगत नाही. भगवंताने दु:ख निर्माण करणारे क्षण निर्माण केलेले नाहीत. आपण भूमातेला आई म्हणतो. तिच्या उदरामध्ये विविध पिके घेतो. या अन्नावर माणूस जगतो. ही माती माणसाला जिवंत ठेवते; परंतु या मातीसाठी आपण काय करतो ? याचाही विचार माणसाने केला पाहिजे. अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी आपण शेतात रासायनिक खतांचा अपरिमित उपयोग करत आहोत. याचाच अर्थ आपण आपल्या आईला विष देत आहोत. यासाठी शेतकर्‍यांनी गायी-म्हशी पाळून सेंद्रीय शेती करण्याची आवश्यकता आहे. यासाठी गोवंश संरक्षण आणि संवर्धन यांची आवश्यकता आहे.’’