दीनानाथ माझा नाथ।

६ डिसेंबर या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांचा महानिर्वाण उत्सव आहे. त्या निमित्ताने…

प.पू. भक्तराज महाराज यांनी ३ फेब्रुवारी १९५७ या दिवशी रचलेले भजन

भजनाची पार्श्वभूमी : इंदूर येथे श्री. रामजीदादा निरगुडकर (प.पू. रामानंद महाराज) यांच्या घरी प.पू. बाबांना हे भजन स्फुरले.

दीनानाथ माझा नाथ ।
पंढरीचा नाथ माझा साईनाथ ।।  धृ. ।।

भावार्थ : प.पू. बाबांना पंढरीचा विठ्ठल काय नि राम-कृष्ण काय ? ते आपल्या सद्गुरूंचे अवतारच वाटायचे. ही त्यांची ठाम श्रद्धा होती. ‘गुरु हे परब्रह्म आहेत, तर सर्व अवतार त्या परब्रह्माचेच, म्हणजेच सद्गुरूंचेच आहेत’, असे ते समजत.

वाळवंटी (टीप १) मेळा भरवी मेळा भरवी ।
चंद्रभागा डोळा दावी । (टीप २)

अनाथांसी हृदयी लावी ।
अनाथांचा नाथ माझा साईनाथ ।। १ ।।

टीप १ – वाळवंटी : ओसाड जीवनात
टीप २ – चंद्रभागा डोळा दावी । : अनुभूती दिली.

भावार्थ : प.पू. बाबांच्या डोळ्यांपुढे सगळी महत्त्वाची देवालये यायची. पंढरीचा विठ्ठल डोळ्यांसमोर यायचा, तसेच कधी ‘संत ज्ञानदेव, संत नामदेव किंवा संत तुकाराम महाराज वारीला निघाले आहेत’, अशीही दृश्ये त्यांना दिसत असत. मग त्यांना वाटायचे, ‘विठ्ठलानेच भक्तांचा मेळावा भरवला आहे. सगळे भक्त डोळे भरून चंद्रभागेकडे पहातात आणि श्रद्धेने तिच्यात स्नान करतात. एखादा गरीब-दुबळा एका बाजूला बसला असेल, तर कुठला तरी वारकरी हृदय कळवळल्यामुळे त्याच्याकडे जातो, त्याची विचारपूस करतो, त्याला काय हवे-नको ते पहातो अन् त्याला साहाय्य करतो. तो अनाथांचा नाथ माझा साईनाथच ना !’

वास करी भक्ताघरी भक्ताघरी ।
गोड त्यांच्या कण्या करी ।
भक्ती कैवल्याचा हरि ।
माझा भोलानाथ माझा साईनाथ ।। २ ।।

भावार्थ : विठ्ठल इतका प्रेमळ आणि कनवाळू आहे की, तो निस्सीम अशा निर्धन भक्ताकडेही जाईल. त्याने दिलेल्या कण्या गोड मानून आवडीने खाईल; कारण माझा भोळा साईनाथ हा भक्ती कैवल्याचा हरिच आहे.

हरि खेळे भक्ताघरी भक्ताघरी ।
गाई रामनाम थोरी ।
बांधी प्रेमरंगी दोरी ।
माझा रंगनाथ माझा साईनाथ ।। ३ ।।

भावार्थ : हरि भक्ताशी खेळेलसुद्धा आणि खेळतोच. त्याला हरिनामाची थोरवी समजावून सांगेल. त्याच्या अंतःकरणात हरिनामाविषयी श्रद्धा उत्पन्न करील. ‘संकटकाळी हरिनामच तुला वाचवेल’, असे प्रेमाने त्याच्या हृदयात ठसवेल. हरि प्रेमाचा एक रेशमी धागा घेऊन भक्ताला आपल्याजवळ बांधून ठेवील आणि त्याला हरिनामाच्या रंगात रंगवेल. असा हा माझा साईनाथ आहे.

प.पू. भक्तराज महाराज विरचित भजनांचे अलौकिकत्व !

प.पू. बाबांची भजने म्हणजे, एक अलौकिक, आनंददायी आणि चिरंतन असा ठेवा !

‘प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) म्हणायचे, ‘भजन हेच माझे जीवन आहे !’ प.पू. बाबांची गुरुसेवेची आत्यंतिक तळमळ, त्यांचा गुरूंविषयीचा अपार भाव, त्यांची अध्यात्मातील शिकवण इत्यादी सारे त्यांच्या भजनांमधून व्यक्त होते.

प.पू. बाबांसारख्या उच्च कोटीच्या संतांनी भजने रचली असल्याने ती पुष्कळ चैतन्यदायी आहेत. त्यामुळे या भजनांद्वारे साधक आणि भक्त यांना विविध स्तरांवरील अनुभूतीही येतात; म्हणूनच प.पू. बाबांची भजने म्हणजे, एक अलौकिक, आनंददायी आणि चिरंतन असा ठेवा आहे.

– डॉ. जयंत बाळाजी आठवले (प.पू. भक्तराज महाराज यांचे शिष्य)