बेळगाव येथील प.पू. कलावतीआई यांच्या अनमोल सुवचनावर डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय गायक पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन !

१. प.पू. कलावतीआई यांचे सुवचन

प.पू. कलावतीआई

‘मनुष्याकडून पावलोपावली चुकीचे वर्तन घडत असते. त्यायोगे दिवसेंदिवस त्याचे पाप अधिकाधिक वाढत जाते. ‘घडलेल्या पापांचे निरसन व्हावे आणि पुढे होणार्‍या पापांना आळा बसावा’, यासाठी मनुष्याला बलवत्तर शक्तीची – परमेश्वर साहाय्याची आवश्यकता असते. हे साहाय्य मिळवून देण्याचे काम प्रार्थना करते; म्हणून प्रार्थना सर्व साधनांत सर्वोत्कृष्ट साधन आहे.’ – प.पू. कलावतीआई, बेळगाव (साभार : ‘बोधामृत’, प्रकरण : ‘प्रार्थनेचे सामर्थ्य’, सुवचन क्र. ३)

२. वरील सुवचनावर पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन

२ अ. ‘प्रार्थना’ या शब्दाची ओळख लहानपणी शाळेमध्ये होते ! : ‘आपल्याला ‘प्रार्थना’ या शब्दाची ओळख प्रथम प्राथमिक शाळेत होते. शाळेत शाळा चालू होण्यापूर्वी २ – ३ प्रार्थना म्हटल्या जातात. मी लहान असतांना ‘हे सरस्वती, नमन तुझ्या पदकमली…’ आणि ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ।’, या प्रार्थना सर्व मुले एका सुरात म्हणत असत. त्यामुळे या प्रार्थना सर्व मुलांना तोंडपाठ होत असत.

२ आ. प्रार्थना ही सर्वशक्तीमान परमेश्वरालाच केली पाहिजे ! : ‘प्रार्थना’ याचा अर्थ विनवणी. आपण विनवणी कुणाचीही करू शकतो; परंतु प.पू. कलावतीआई म्हणतात, ‘आपण सर्वशक्तीमान परमेश्वरालाच विनवणी केली पाहिजे.’ ‘मला चांगली बुद्धी दे. माझ्यातले दोष घालवून टाक. मला सर्व चराचरात तो सर्वशक्तीमान प्रभु दिसू दे. माझ्या हातून चांगले कार्य घडू दे. माझ्या हातून इतरांना साहाय्य होऊ दे’, अशा प्रकारे ईश्वराची प्रार्थना केली असता, एक ना एक दिवस ईश्वर आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतो आणि आपल्या हातून चांगली कर्मे घडू लागतात.

२ इ. प्रार्थनेचे विविध प्रकार

२ इ १. ‘रामरक्षा’ हीसुद्धा प्रार्थनाच आहे ! : प्रार्थना संध्याकाळच्या कातरवेळी केली असता ती ईश्वरापर्यंत नक्की पोचते. रामरक्षा हीसुद्धा एक प्रार्थनाच आहे. रामरक्षेमध्ये ‘शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः ।’(म्हणजे ‘रघुकुळात जन्मलेला राम माझ्या मस्तकाचे रक्षण करो, दशरथपुत्र राम माझ्या कपाळाचे रक्षण करो.’), ‘कौसल्येयो दृशौ पातु ।’ (म्हणजे ‘कौसल्यापुत्र रामाने माझ्या दोन्ही डोळ्यांचे रक्षण करावे.’), ‘मुखं सौमित्रिवत्सलः ।’ (म्हणजे ‘लक्ष्मणाला प्रिय असणारा राम माझ्या मुखाचे रक्षण करो.’) अशा प्रकारे एकेका अवयवाचे नाव घेऊन आणि त्याला रामाचे एकेक नाव जोडून ‘रामा, तू त्या त्या अवयवाचे रक्षण कर’, अशी प्रार्थना आहे. याला ‘संरक्षककवच’, असेही म्हणतात.

पू. किरण फाटक

२ इ २. संतांनी ग्रंथलेखन करतांना आरंभी देवतांना प्रार्थना केलेली असते ! : संत आध्यात्मिक ग्रंथांच्या लेखनाला आरंभ करतांना प्रथम गणपति, नंतर सरस्वती आणि त्यानंतर तो ग्रंथ वाचणारे लोक, यांना प्रार्थना करतात. ज्ञानेश्वरी असो किंवा दासबोध, त्यामध्ये ही प्रार्थना केलेली आहे. ती आपल्याला वाचायला मिळते. अशी प्रार्थना करण्याचा लेखकाचा उद्देश असतो, ‘मी लिहायला घेतलेला हा ग्रंथ माझ्या हातून चांगल्या प्रकारे लिहिला जावा आणि लोकांनी वर्षानुवर्षे तो वाचावा.’ ‘हे गणराया, हे माता सरस्वती, आमच्यावर कृपादृष्टी ठेव. आमच्या बुद्धीला चालना देऊन या ग्रंथाची निर्मिती कर. तुमच्या कृपेनेच हा ग्रंथ लिहिला जाणार आहे’, ही प्रार्थना आपल्याला प्रत्येक ग्रंथ किंवा पोथी यांमध्ये सापडते.

२ इ ३. कोणत्याही कार्यक्रमाचा आरंभ गणेशस्तवनाने, म्हणजेच प्रार्थनेने होतो ! : कुठल्याही मोठ्या कार्यक्रमाचा प्रारंभ गणेशस्तवनाने होतो. त्याचप्रमाणे पूर्वी तमाशातसुद्धा आरंभी गणेशस्तवन होत असे. गणेश ही सर्व संकटांचा नाश करणारी देवता मानली जाते आणि गणेशाला पूजेचा प्रथम मान दिला जातो.

२ इ ४. ‘नवस’ ही प्रार्थनाच असून ती भारतात प्रचलित आहे ! : ‘नवस’ हीसुद्धा एक प्रकारची प्रार्थना असते. ‘जर माझे अमुक चांगले झाले, तर मी अमुक करीन’, असे एखाद्या जागृत देवस्थानामध्ये म्हटले जाते आणि जर मनातील इच्छा पूर्ण झाली, तर त्याप्रमाणे केले जाते; किंबहुना केले जावे. ही प्रथा केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात प्रचलित आहे.

२ इ ५. सर्व धर्मांत ईश्वराकडे आपल्या चुकांविषयी केली जाणारी क्षमायाचना ! : प्रार्थना या सर्व धर्मांत असतात. सर्वशक्तीमान ईश्वराकडे आपल्या चुकांचे निवेदन करून ‘हे देवा, आमच्या हातून झालेल्या चुकांना क्षमा कर. आमच्यावर दया कर’, अशी प्रार्थना सर्व धर्मांत केली जाते.

२ इ ६. नवविधा भक्तीतील ‘आत्मनिवेदन भक्ती’, हा प्रार्थनेचा एक प्रकार असावा.

२ इ ७. परिस्थितीच्या समोर हतबल झाल्यावर मनुष्य ईश्वराला करत असलेली प्रार्थना ! : माणूस परिस्थितीच्या समोर हतबल झाला आणि त्याला योग्य मार्ग सापडेनासा झाला की, तो ईश्वराच्या चरणी लीन होऊन त्याला विनवू लागतो, ‘हे ईश्वरा, मला योग्य तो मार्ग दाखव आणि माझी या विचित्र परिस्थितीतून सुटका कर.’

२ इ ८. देवाची आरती, म्हणजे एक प्रकारची प्रार्थनाच ! : प्रत्येक देवाची आरती, म्हणजे देवाची आर्त स्वरात केलेली विनवणी. ही एक प्रकारची प्रार्थनाच असते. समर्थ रामदासस्वामींनी अनेक आरत्यांची रचना केली. त्यांतील ‘सुखकर्ता दुखहर्ता…’ ही गणपतीची आरती सर्वत्र म्हटली जाते. आपल्याकडे गणपति उत्सवात गणपति, देवी, दत्त, पांडुरंग, ज्ञानेश्वर माऊली, महादेव शंकर, यांच्या आरत्या एकापाठोपाठ एक म्हटल्या जातात.

२ इ ९. चित्रपटांमधील प्रार्थनागीते : अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये मोठमोठ्या प्रतिभावंत गायक-गायिकांनी गायलेली प्रार्थनागीते आपल्याला ऐकावयास मिळतात. त्यांतील काही निवडक गीते पुढे दिली आहेत.

२ इ ९ अ. हिंदी प्रार्थनागीते

१. दुनिया में तेरा है बडा नाम, आज मुझे भी तुझसे पड गया काम ।

२. तू प्यार का सागर है, तेरी एक बूंद के प्यासे हम ।

३. ए मालिक, तेरे बंदे हम ।

४. चुपचुप मीरा रोए, दर्द ना जाने कोय, मोसे मोरा शाम रूठा ।

५. इतनी शक्ति हमे देना दाता ।

६. हमको मन की शक्ति देना ।

७. तुम्हीं हो माता, पिता तुम्हीं हो ।

२ इ ९ आ. मराठी प्रार्थनागीते

१. तू बुद्धी दे, तू तेज दे ।

२. गगन सदन तेजोमय ।

३. हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे ।
माणसाने माणसाशी माणसासम वागणे ।।

४. नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा ।
सत्यं शिवं सुंदरा ।
शब्दरूप शक्ती दे ।
भावरूप भक्ती दे ।
प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा ।।

५. दे रे कान्हा चोळी लुगडी ।

२ ई. संतांनी केलेल्या प्रार्थना

२ ई १. सद्गुरु वामनराव पै यांची विश्वप्रार्थना : आपल्याकडे परम पूज्य श्री वामनराव पै यांची प्रार्थना अतिशय प्रसिद्ध आहे. ही सद्गुरु वामनराव पै यांनी स्थापन केलेल्या ‘जीवनविद्या मिशन’ या प्रसिद्ध संस्थेच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत पोचलेली आणि सर्वांच्या परिचयाची अशी विश्वप्रार्थना पुढे दिली आहे.

‘हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव; सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे !’

२ ई २. संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर यांचे ‘पसायदान’ हीसुद्धा एक प्रार्थनाच आहे. ही प्रार्थना सगळीकडे मोठ्या प्रेमाने म्हटली जाते.

म्हणून प.पू. कलावतीआई म्हणतात, ‘प्रार्थना सर्व साधनांत सर्वोत्कृष्ट साधन आहे.’

– (पू.) किरण फाटक, डोंबिवली, जिल्हा ठाणे. (२५.८.२०२३)

प्रार्थना केल्याने होणारे लाभ !

‘हे देवा, तू मला, माझ्या मुलांना आणि माझ्या बायकोला सर्व प्रकारे सांभाळ अन् आमच्यावरची सर्व संकटे निघून जाऊ दे’, अशा प्रकारे आपण देवाला प्रार्थना करतो.

१. प्रार्थनेमुळे आपले व्यक्तीमत्त्व आकर्षक आणि प्रेमळ होते.

२. लोकांच्या मनात आपल्याविषयी आदरभावना निर्माण होते.

३. प्रार्थनेमुळे आपण दिवसातून एकदा तरी सर्वशक्तीमान ईश्वराची आठवण करतो.

४. प्रार्थना केल्याने ईश्वराचे साहाय्य मिळाल्याने अनेक संकटांतून मुक्त झाल्याची अनुभूती येणे : माणसाने जर अनन्यभावाने ईश्वराला प्रार्थना केली, तर ईश्वर नक्कीच त्याच्या साहाय्यास धावून जातो. याचे एक चांगले उदाहरण म्हणजे, वस्त्रहरणप्रसंगी जेव्हा द्रौपदीने श्रीकृष्णाचा धावा केला, तेव्हा श्रीकृष्ण तिच्या साहाय्याला धावून आला. दुसर्‍या एका प्रसंगात हत्तीचा पाय मगरीने पाण्यामध्ये धरला असता हत्तीने काकुळतीला येऊन श्रीकृष्णाचा धावा केला आणि श्रीकृष्णाने त्याला साहाय्याचा हात दिला. त्याला संकटापासून मुक्त केले. असे अनेक प्रसंग आपण इतिहास किंवा पुराणे यांतून शिकत असतो; म्हणून नेहमी प्रार्थना करावी.

५. खडतर प्रारब्ध भोगत असतांना प्रार्थना केल्याने मनाला शांती आणि समाधान मिळणे : कर्मसिद्धांताप्रमाणे आणि ‘जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर…’, या गाण्याप्रमाणे माणसाला त्याच्या कर्माची चांगली किंवा वाईट फळे मिळतात. ही कर्मफळे त्याला या जन्मातच मिळतात, असे नाही, तर पुढल्या जन्मातही ती मिळू शकतात. माणसाला केवळ वर्तमानातील एकच जन्म दिसतो आणि कळतो; परंतु माणूस परत परत जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांमध्ये फिरत असतो. त्यामुळे माणसाला कर्मफलही कुठल्यातरी एका जन्मामध्ये मिळत असते. त्यालाच माणसाचे ‘प्रारब्ध’ असे म्हणतात. हे खडतर प्रारब्ध भोगत असतांना प्रार्थना केल्याने माणसाच्या मनाला शांती आणि समाधान मिळत रहाते.’

– (पू.) किरण फाटक, (२५.८.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक