सणासुदीच्या विशेषतः दिवाळीच्या काळात तुपाच्या मागणीत वाढ होते. ‘मुंबई कृषी उत्पादन बाजार समिती’मध्ये साधारणतः १ टन तुपाची आवक होते. सणाच्या काळात यात वाढ होते. सध्या मुंबई बाजार समितीमध्ये तूप ४८० ते ७५० रुपये किलो दराने विकले जात आहे. प्रत्येक दुकानामध्ये विविध आस्थापनांप्रमाणे तुपाच्या दरामध्ये भेद आहे. प्रत्येकच तूप विकणारे आस्थापन ते १०० टक्के शुद्ध असल्याचा दावा करत असले तरी ‘खरेच आपण खात असलेले तूप शुद्ध असते का ?’, हा मोठा कळीचा प्रश्न आहे. सणासुदीच्या काळात तुपाची मागणी वाढल्याने बाजारात भेसळयुक्त तूपही मोठ्या प्रमाणात येते. भेसळीमुळे न केवळ त्या अन्नपदार्थांचा दर्जा खालावतो आणि ते ग्रहण करणार्याचे आरोग्यही धोक्यात येते. लहान मुलांपासून अबालवृद्धांपर्यंत हे भेसळयुक्त तूप खाल्ल्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. हृदयरोग, उच्च रक्तदाब, पचनाशी संबंधित आजार होण्याची शक्यता असते. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्यही खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असते, असे अनेक प्रकार उघडकीस येतात. काही दिवसांपूर्वीच बनावट पनीर आणि मावा बनवणार्या कारखान्यांवर पुणे पोलिसांनी कारवाई केली. त्यामुळे कोणतेही साहित्य खरेदी करण्यापूर्वी ‘ते शुद्ध आहे ना ?’, हे पडताळून घेण्याची आवश्यकता आहे.
भेसळ करून नागरिकांच्या जिवाशी खेळणे, हे माणुसकीला काळीमा फासणारे गंभीर कृत्य आहे. यात माणूसच माणसाचा वैरी असल्याचे दिसून येते. मनुष्य केवळ स्वार्थाचा विचार करतांना दिसतो. अन्नपदार्थांमध्ये होणारी ही मोठ्या प्रमाणातील भेसळ, म्हणजे एक प्रकारचा भ्रष्टाचारच आहे ! केवळ पैसे कमावण्यासाठी भेसळ करून ग्राहकांच्या जिवाशी खेळणार्या अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हायला हवी. त्याचे गंभीर परिणाम सर्वसामान्य नागरिकांना भोगावे लागतात. अन्नपदार्थांत भेसळ असेल, तर ग्राहकांनी ग्राहक मंचाकडे तक्रार करून संबंधितांना शिक्षा होईपर्यंत लढा द्यायला हवा.
सणांच्या पार्श्वभूमीवर मिठाई, तूप, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी ‘अन्न आणि औषध प्रशासन विभाग’ हा नियमित कारवाई करतो. विशेषतः उत्सवाच्या काळात ही ‘भेसळविरोधी मोहीम’ मोठ्या प्रमाणात राबवली जाते; परंतु शासनासमवेत जनतेनेही जागरूक राहून भेसळयुक्त खाद्यपदार्थांविषयी सतर्कता बाळगणे आणि त्याविषयी तक्रार करणे, हे महत्त्वाचे आहे !
– सौ. प्रज्ञा जोशी, पनवेल.