Dainik Sanatan Prabhat Goa-Sindhudurg : प.पू. भक्तराज महाराज महानिर्वाण दिन (६ डिसेंबर २०२३) या शुभदिनापासून दैनिक ‘सनातन प्रभात’च्या गोवा-सिंधुदुर्ग आवृत्तीचे नियमितचे अंक रंगीत स्वरूपात !

वाचक, हितचिंतक आणि विज्ञापनदाते यांना निवेदन !

राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची वृत्ते हिंदूंपर्यंत पोचवून त्यांच्यात जागृती करणारे ‘सनातन प्रभात’ हे एकमेव दैनिक आहे. गेली २५ वर्षे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हे दैनिक प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. या वाटचालीत वाचक, हितचिंतक आणि विज्ञापनदाते यांचा आम्हाला भरघोस पाठिंबा लाभला. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने ६ डिसेंबर २०२३ पासून गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्तीचा नियमितचा अंक आम्ही रंगीत प्रकाशित करत आहोत.

दैनिकाच्या मूल्यात वाढ

नियमितचे दैनिक रंगीत होण्यासमवेतच दैनिकाचे मूल्यही वाढवावे लागत आहे. दैनिकाचे सुधारित मूल्य प्रतिदिन ५ रुपये आणि रविवारी ६ रुपये, असे ६ डिसेंबरपासून आकारण्यात येईल, याची वाचकांनी नोंद घ्यावी.

गेल्या ८ वर्षांत वाढत्या महागाईच्या पार्श्‍वभूमीवर छपाईचा कागद, शाई आदींच्या मूल्यात झालेल्या वाढीमुळे दैनिकाच्या छपाईचा खर्च वाढला, तरी वाचकांसाठी आम्ही दैनिकाचे मूल्य वाढवले नाही; परंतु आता किंमत वाढवणे अपरिहार्य ठरत आहे. दैनिकाच्या मूल्यात १ रुपयाने वाढ होणार असली, तरी वाचकांनी राष्ट्रोत्थानाच्या कार्यासाठी केलेला तो त्यागच असेल. वाचकांनी आतापर्यंत ‘सनातन प्रभात’ला ज्या प्रकारे सहकार्य केले, तसाच उदंड प्रतिसाद याहीपुढे मिळत राहील, याची आम्हाला निश्‍चिती आहे ! – संपादक