लेखक : ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.
‘वर्ष १९७१ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या कराची बंदरावर जोरदार आक्रमण केले होते. त्यानिमित्त भारतीय नौदलाच्या वतीने प्रतिवर्षी ४ डिसेंबर हा दिवस ‘विजयदिन’ म्हणून साजरा केला जातो. यंदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे ‘नौदलदिन’ भव्य स्वरूपात साजरा केला जाणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित रहाणार आहेत. सिंधुदुर्गात होणार्या या कार्यक्रमामध्ये युद्धनौका सहभागी होणार आहेत. या वेळी तारकर्ली, मालवण येथील समुद्रात भारतीय नौदलाच्या सामर्थ्याचे शक्तीप्रदर्शन होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आरमार आणि सागरी सुरक्षा यांना प्राधान्य दिले होते. व्यापारी, चाचे आणि ब्रिटीश यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सागरी गडांची आवश्यकता असल्याचे त्यांनी जाणले होते. त्यातूनच त्यांनी अभेद्य अशा सिंधुदुर्ग गडाची उभारणी केली होती.
१. भारतीय नौदलाची यशस्वी वाटचाल !
१ अ. नौदलाची ‘ऑपरेशन ट्रायडंट’ कामगिरी ! : भारतीय नौदल हे जगातील ५ व्या क्रमांकाचे नौदल आहे. भारतीय महासागर क्षेत्रात संतुलन आणि सुरक्षा राखण्याचे काम नौदलाकडून होते. वर्ष १९७१ मध्ये भारतीय नौदलाने पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात कराची बंदरावर आक्रमण करण्यात, विशाखापट्टणम्वरचे आक्रमण परतवून लावण्यात आणि पूर्व पाकिस्तानातील नौदलाचे उच्चाटन करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली होती. या कामगिरीचे नाव ‘ऑपरेशन ट्रायडंट’ असे होते.
१ आ. पाणबुड्यांची वाढती संख्या : भारतीय नौदलाने पारंपरिक आणि अणू इंधनावर चालणार्या पाणबुड्या आणि सरकारी गोद्या बांधण्याची प्रक्रिया चालू केली. त्यासाठी खासगी आस्थापनांसमवेत करार करून वेगाने नौकाबांधणीची प्रक्रिया चालू केली. यातील काही प्रकल्प यशस्वी ठरले, तर काही लालफितीत बारगळले. सध्या देशभरातील विविध गोदींमध्ये ३४ युद्धनौका आणि पाणबुड्या यांची बांधणी चालू आहे. स्वदेशी बनावटीच्या विविध श्रेण्यांच्या काही युद्धनौका आणि पाणबुड्या नौदलात भरती झाल्या आहेत. भारताकडे १५ पारंपरिक पाणबुड्या, २ अणू इंधनावर चालणार्या आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागणार्या पाणबुड्या आहेत.
पाणबुड्यांच्या संदर्भात भारतीय नौदल हे पाकिस्तानहून पुष्कळ बलशाली आहे. असे असले, तरी चीन भारतीय नौदलाहून आघाडीवर आहे. चीनकडे ७८ पाणबुड्या आहेत. त्यांपैकी ६ अत्याधुनिक बॅलॅस्टिक आण्विक पाणबुड्या असून त्यांचा पल्ला ७ सहस्र २०० किलोमीटरचा आहे. अणू इंधनावर चालणार्या १४ आणि ५७ पारंपरिक पाणबुड्या आहेत.
१ इ. ‘अरिहंत’ पाणबुडी ! : अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या ‘के-४’ क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण ‘अरिहंत’ या पाणबुडीवरून यशस्वीपणे करण्यात आले आहे. या चाचणीने भारताच्या नौदलाचे बळ अनेक देशांच्या सामर्थ्याला यशस्वीपणे टक्कर देऊ शकण्याइतके वाढले आहे.
के-४ क्षेपणास्त्र आणि ‘अरिहंत’ पाणबुडी दोन्ही स्वदेशी बनावटीच्या आहेत. पाण्याखाली असतांना पाणबुडीमध्ये बिघाड झाल्यास त्यात अडकलेल्या नौसैनिकांच्या सुटकेसाठी नौदलाने नवी यंत्रणा सक्रीय केली आहे. ‘डीप सबमर्जन्स रेस्क्यू व्हेईकल’ हे पाणबुडी रक्षक वाहन नौदलाच्या पश्चिमी ताफ्यात भरती झाले आहे.
१ ई. महिलांना नौदलात अधिक संधी ! : काही वर्षांपासून नौदलात महिला अधिकारी आणि सैनिक कार्यरत आहेत; पण त्यांना युद्धनौकांवर काम करण्याची संधी अजून मिळालेली नाही. सध्या युद्धनौकांवर महिला अधिकारी आणि सैनिक यांच्यासाठी आवश्यक सुविधांची निर्मिती चालू आहे. त्यामुळे येत्या काळात नौदलात महिलाही खलाशी (सेलर) म्हणून दिसू शकतील.
२. भारतीय नौदलासमोरील विविध आव्हाने आणि त्यावर केलेली मात
अ. पालटत्या जागतिक समीकरणांमुळे भारतीय नौदलासमोरील आव्हाने पालटली आहेत. पाणबुड्या, विमानवाहू आणि अन्य युद्धनौका यांच्या बांधणीत चीनच्या वेगाशी स्पर्धा करणे अन्य कोणत्याही देशाला शक्य झालेले नाही.
आ. भारताने २६/११ च्या आक्रमणाच्या रूपात समुद्री मार्गाने येणारे संकट अनुभवले आहे. समुद्री चाच्यांनी इंडोनेशियाकडून सोमालियाकडे मोर्चा वळवला होता. त्यामुळे जगभरातील व्यापारी नौकांना सोमालियन चाच्यांची दहशत बसली होती; परंतु भारतीय नौदलाने सोमालियन चाचेगिरीवर नियंत्रण मिळवले आहे.
इ. सध्या चीन आणि पाकिस्तान एकत्र येऊन आण्विक कार्यक्रम जोमाने रेटत आहेत. चीनकडे बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा मोठा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे भारताने सागरी युद्धातील त्याचे बळ वाढवणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी ताफ्यातील नौकांची संख्या वाढवणे, त्यासाठी आवश्यक आर्थिक प्रावधान करणे, आधुनिक शस्त्रास्त्रे, यंत्रणा खरेदी करणे, अत्याधुनिक विमाने आणि हेलिकॉप्टर यांचा अभाव भरून काढून नौदलाचा हवाई विभाग अधिक सक्षम करणे आदी आव्हाने आहेत, तसेच मनुष्यबळाचीही कमतरता आहे. त्याचा परिणाम नौदलाच्या सुसज्जतेवर होत आहे. एकूणच नौदलापुढे मोठी आव्हाने असली, तरी भारतीय नौदल वेगाने आव्हानांवर मात करत आहे.
३. नवा नौदल ध्वज !
लवकरच २०० युद्धनौकांच्या सुसज्ज आणि स्वयंपूर्ण ताफ्यासह भारतीय नौदल सिद्ध होईल. भूतकाळातील वसाहतवादी गुलामीच्या खुणा पुसून टाकत छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित अशा मुद्रा चिन्हांकित नौदलाच्या नवीन ध्वजाचे पंतप्रधानांनी अनावरण केले आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरित नवा नौदल ध्वज समुद्रात आणि आकाशात दिमाखात फडकणार आहे.
४. भारतीय नौदलातील ‘आय.एन्.एस्. विक्रमादित्य’ आणि ‘आय.एन्.एस्. विक्रांत’ युद्धनौका !
भारतीय नौदलाची मदार ‘आय.एन्.एस्. विक्रमादित्य’ या विमानवाहू युद्धनौकेवर आहे. मध्यंतरी काही मास ही नौका डागडुजीसाठी कोचीन शिपयार्डमध्ये होती. ७०० कोटी रुपये खर्चून तिची डागडुजी करण्यात आली. स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका ‘आय.एन्.एस्. विक्रांत’ नौदलात दाखल झाली आहे. भारतातील मोठे उद्योग, तसेच १०० हून अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग यांनी पुरवलेली देशी उपकरणे आणि यंत्रसामुग्री यांचा वापर करून ‘आय.एन्.एस्. विक्रांत’ची निर्मिती झाली आहे. ही भारताच्या सागरी आणि नौदल इतिहासातील आजवरची सर्वांत मोठी युद्धनौका आहे; तसेच यावर अत्याधुनिक स्वयंचलित वैशिष्ट्ये आहेत.
‘आय.एन्.एस्. विक्रांत ही’ केवळ युद्धनौकाच नाही, तर हे २१ व्या शतकातील भारताचे परिश्रम, कौशल्य, प्रभाव आणि कटीबद्धता याचे मूर्तीमंत उदाहरण आहे, तसेच ते ‘भारत आत्मनिर्भर होत आहे’, याचेही अद्वितीय उदाहरण आहे. ते स्वदेशी क्षमता, स्वदेशी स्रोत आणि स्वदेशी कौशल्य यांचे प्रतीक आहे. विक्रांतवर नौदलाच्या अनेक महिला सैनिकांची नियुक्ती केली जाईल. अथांग सागरी शक्तीला अमर्याद स्त्रीशक्तीची जोड मिळेल.
सागरी सुरक्षेतील धोके आणि त्यावरील उपाययोजना !
१. छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती लक्षात घ्या ! : आज देशाला समुद्रमार्र्गांनी होणारी तस्करी, अनधिकृत व्यापार, अनधिकृत मासेमारी, पूर्व किनारपट्टीवरील बांगलादेशी घुसखोरी अशा विविध धोक्यांचा सामना करावा लागत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती लक्षात घेऊन आपणही समुद्रकिनार्यांवरून होणारा शत्रूचा धोका थांबवू शकतो.
२. समुद्री आरमारावर लक्ष केंद्रित करणारे एकमेव राजे छत्रपती शिवाजी महाराज ! : इतिहासात डोकावले, तर लक्षात येईल की, छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव राजे होते, ज्यांनी त्यांचे लक्ष समुद्री आरमारावर केंद्रित केले होते. त्यासाठी त्यांनी समुद्रकिनार्याजवळ गड बांधले आणि समुद्रमार्गे येणार्या शत्रूपासून राष्ट्राचे संरक्षण केले होते. ते जलदुर्ग आजही अस्तित्वात आहेत.
३. सागरी सुरक्षा करणार्यांचे महत्त्व : आज भारताच्या सागरी सुरक्षेसाठी भारतीय नौदल, तटरक्षकदल, सागरी पोलीस यांच्यासह अनेक घटक कार्यान्वित आहेत. गुप्त माहिती देण्यासाठी गुप्तहेर संस्था, मोठ्या बंदरांचे रक्षण करण्यासाठी ‘सी.एल्.आय.एफ्.एफ्.’, तसेच लहान बंदरांसाठी खासगी सुरक्षा आस्थापने आहेत. यासमवेतच आपले कोळी बांधवही सागरी सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका पार पाडतात. यापैकी एखादा घटक पूर्णपणे समर्थ नसेल, तरीही त्याचा अर्थ ‘आपल्या सागरी सुरक्षेमध्ये उणीव आहे’, असा होत नाही; कारण ही बहुस्तरीय सुरक्षारचना आहे.
४. सागरी सुरक्षाव्यवस्था सिद्ध : वर्ष २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर सरकारने १५ सहस्र कोटी रुपये खर्च करून सागरी सुरक्षाव्यवस्था सिद्ध करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. देशाला ७ सहस्र ५१६ किलोमीटर लांब समुद्रकिनारा लाभला आहे. त्यावर ‘इलेक्ट्रॉनिक’ उपकरणांच्या माध्यमातून लक्ष ठेवले जात आहे. तसेच समुद्रातील गस्तही वाढवण्यात आली आहे. यापूर्वी भारतीय नौदलाकडे सागरी सुरक्षेसाठी लहान बोटी नव्हत्या. आता भारतीय नौदलाला ९५ ‘फास्ट इंटरसेफ्टर क्राफ्ट’ आणि १७ ‘इमिजेट सपोर्ट व्हेसल्स’ मिळालेल्या आहेत. यामुळे समुद्रकिनार्यावरील बाँबे हायच्या ‘ऑईल प्लॅटफॉर्म’चे रक्षण करणे सोपे होणार आहे. या प्लॅटफॉर्मच्या रक्षणासाठी नौदलाने १ सहस्र नौदल सैनिकांचे सागरी प्रहारी दल सिद्ध केले आहे.
५. समुद्रकिनारी रहाणारे, तसेच गुप्तहेर यांचे कर्तव्य ! : छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात ३५० हून अधिक गड बांधले होतेच; पण त्याहून अधिक बलवान असे त्यांनी माणसांचे सैन्य सिद्ध केले होते. त्यामुळे समुद्रकिनारी रहाणारे कोळीबांधव आणि इतर यांनीही देशाच्या सुरक्षाव्यवस्थेचे डोळे बनून संशयास्पद वाटणार्या किनार्यावरील हालचालींविषयी त्वरित सूचना दिली पाहिजे. संशयास्पद वाटणार्या अनोळखी बोटींकडे लक्ष ठेवले पाहिजे. नौदलाने अमली पदार्थांची तस्करी थांबवली पाहिजे; पण अजूनही धोका कायम आहे. त्यामुळे नौदलाने तांत्रिक सुधारणा, गुप्तहेर माहितीचा दर्जा वाढवणे, सुरक्षा दलांचे परस्पर समन्वय वाढवून गस्तीचा दर्जा वाढवणे यांसारख्या उपाययोजना केल्यास आपण सागरीसुरक्षा अभेद्य करण्याच्या दिशेने वाटचाल करू शकतो.’
अरिहंत पाणबुडीची वैशिष्ट्ये
१. ‘ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी व्हेसल’ या गटात मोडणारी ही भारतीय बनावटीची पहिली आण्विक पाणबुडी
२. ‘अरिहंत’ या शब्दाचा अर्थ शत्रूचा नायनाट करणारा
३. आय.एन्.एस्. अरिहंत ही पाणी, भूमी आणि आकाश अशा तिन्ही स्तरांवर अण्वस्त्रांचा मारा करण्यास सक्षम
४. आय.एन्.एस्. अरिहंतची मारा करण्याची क्षमता ७५० ते ३ सहस्र ५०० कि.मी.
आय.एन्.एस्. विक्रांतची वैशिष्ट्ये
१. एकूण लांबी २८४ मी. (३ फूटबॉल मैदानांइतकी), उंची २० माळे, वजन ४४ सहस्र ५०० टन, जहाजात एकूण २२ डेक आहे.
२. जहाजाची गती : प्रतिघंटा ३० कि.मी.हून अधिक
३. जहाजावरील विमान घटक : मिग २९ के, कामोव ३१, कामोव २८, सीकिंग, ए.एल्.एच्., चेतक
४. १ सहस्र ६०० सैनिक आणि कर्मचारी असलेले आय.एन्.एस्. विक्रांत हे एक तरंगते शहरच