रेल्वेतील असुविधा !

काही दिवसांपूर्वी कोकणातून पनवेल येथे जनशताब्दी एक्सप्रेसने येत असतांना प्रवासात काही किळसवाणे आणि त्रासदायक अनुभव आले. ज्या रेल्वे डब्यात होतो त्यातील प्रसाधनगृहापासून जवळच माझी जागा होती. रेल्वे डब्यात चढल्यानंतर तेथील हस्तप्रक्षालनपात्रात अर्ध्यापर्यंत पाणी तुंबल्याचे लक्षात आले. प्रवासात डबे हालत असल्याने त्या हस्तप्रक्षालनपात्रातील पाणी बाहेर पडत होते. काही वेळाने प्रसाधनगृहातून पाणी डब्यात प्रवाशांच्या आसनांच्या दिशेने येत होते. त्यामुळे प्रवाशांना खाली साहित्याच्या बॅगा ठेवता येत नव्हत्या. अचानक पाणी आल्याने आणि ते कुठून येत आहे तेही न कळल्याने काही प्रवाशांना बॅगांना पाणी लागत आहे, हेही लक्षात आले नाही आणि बॅगा भिजल्या. काही वेळाने एक व्यक्ती रेल्वे डब्याच्या दारातच सिगारेट ओढून धूम्रपान करत होती. त्याचा धूर पूर्ण डब्यात पसरून प्रवाशांना त्रास झाला. रेल्वेत धूम्रपान करण्यास बंदी असतांनाही तिचे असे धाडस होणे आश्चर्यकारक वाटले. तिला त्याविषयी सांगितल्यावर मग नाईलाजास्तव तिने धूम्रपान करणे थांबवले. ‘वरील तिन्ही घटना पाहिल्या तर रेल्वेने प्रवास करणे खरेच एवढे असुविधाजनक झाले आहे का ? प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाचे काही नियंत्रण नाही का ?’, असे प्रश्न साहजिकच मनात आले. रेल्वेसंदर्भात असे अनेक वाईट अनुभव प्रवाशांच्या वाट्याला येतात. रेल्वेचे तिकीट काढतांना होणारी गैरसोय, तिकीट काढूनही प्रत्यक्ष प्रवासाच्या वेळी बसण्यास होणारी गैरसोय, प्रवासाच्या काळात लोकांची दादागिरी, रेल्वे डब्याच्या प्रसाधनगृहातील अस्वच्छता यांमुळे रेल्वेप्रवास कधी एकदा संपतो असे होते; परंतु असे असूनही प्रवासी त्याविषयी केवळ एकमेकांजवळ चर्चा करण्यापलीकडे काही करत नाहीत. लोकांनाही आता याची सवय होऊन जाते.

खरेतर रेल्वे ही राष्ट्रीय संपत्ती आहे. प्रवाशांचा ये-जा करण्यासाठीचे ते मोठे सार्वजनिक माध्यम आहे. प्रवाशांमध्ये लहान मुलांपासून वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्व व्यक्ती असतात. सर्वांनाच या असुविधेला सामोरे जावे लागते. एकीकडे देशभरात आपण ‘स्वच्छ भारत अभियान’ राबवत आहोत. ‘मेक इन इंडिया’द्वारे नवनवीन तंत्रज्ञान वापरून मेट्रो, मोनोरेल काढत आहोत; परंतु सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग असलेल्या रेल्वेतील मूलभूत सुविधांकडे काही प्रमाणात दुर्लक्ष होत आहे, हे वास्तव आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची किती आणि कुठे गैरसोय होत आहे, हे प्राधान्याने जाणून घेऊन त्यावर गतीने उपाययोजना काढण्याच्या कार्यपद्धती अधिक सशक्त करायला हव्यात !

– श्री. संदेश नाणोसकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.