‘काही साधक बहिर्मुख दृष्टी ठेवून ‘संत दिसतात कसे ? ते चालतात-बोलतात कसे ?’, अशा गोष्टींकडे लक्ष देतात. काही साधकांना संतांनी चूक सांगितली, तर नंतर ते साधक ‘आता संत आपल्यावर नाराज झाले आहेत’, असा ग्रह करून घेतात. कधी संतांनी दोन साधकांमध्ये असलेल्या मनाच्या स्तरावरील अडचणी सोडवल्यावर ‘संत माझी बाजू समजून घेत नाहीत’, असेही एखाद्या साधकाला वाटते. अशासारखी उदाहरणे ही संतांकडे बहिर्मुख दृष्टीने पहाण्याची लक्षणे आहेत.
खरे पहाता संतसहवास मिळायला पुष्कळ भाग्य लाभते. साधकांनी संतांकडे अंतर्मुख दृष्टीने पाहिल्यासच त्यांना संतांमधील देवत्वाचा खरा लाभ होतो. ‘संतांचा सहवास लाभल्यावर त्यांच्यातील चैतन्याचा लाभ होण्यासाठी प्रार्थना करणे, ‘संत जे काही सांगतात ते आपल्या कल्याणासाठीच आहे’ असे समजणे, त्यांच्या गुणांचा अभ्यास करून ते गुण आपल्यात आणणे, त्यांच्याकडून आध्यात्मिक स्तरावर शिकणे, त्यांच्या सहवासात भावाच्या स्तरावर रहाणे’, यांसारखे प्रयत्न करणे, म्हणजे संतांकडे अंतर्मुख दृष्टीने पहाणे होय. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले त्यांच्या गुरूंसमोर कधीच बसायचे नाहीत, तर उभेच रहायचे आणि गुरूंनी सहज बोललेल्या प्रत्येक वाक्यातूनही शिकायचे ! एवढा भाव साधकांमध्ये आहे का ? संतांच्या सहवासात रहायला मिळत असूनही त्यांचा योग्य लाभ करून न घेणार्या साधकांची स्थिती ‘दिव्याखाली अंधार’, अशी होते. असे होऊ नये, यासाठी साधकांनी साधनेचे प्रयत्न वाढवायला हवेत.’
– (पू.) संदीप आळशी (२३.१०.२०२३)