१. प्रपंचातील सुख-दुःख यांची कोडी सोडवण्यात आयुष्य घालवण्याऐवजी ती प्रभु चरणांवर ठेवावीत आणि आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी भगवंताकडे बल अन् आशीर्वाद मागावे !
‘माणसाचे संपूर्ण आयुष्य प्रपंचातील सुख-दु:ख यांची कोडी सोडवण्यातच जाते; मात्र कोड्याचा संपूर्ण तक्ता सुटतच नाही. उलट शेष राहिलेल्या प्रश्नांचे कोडे न सुटल्याने मानसिक त्रासच होतो. त्यापेक्षा प्रपंचाचा हा कोडेरूपी तक्ता प्रभूच्या चरणांवर ठेवावा. (योग्य क्रियमाण करून प्रपंचाचा भार परमेश्वरावर सोडावा.) आपण आपली साधना होण्यासाठी आणि आध्यात्मिक प्रगतीचे अडलेले कोडे सोडवण्यासाठी भगवंताकडे बल अन् आशीर्वाद मागूया.
२. प्रपंचाचे कोडे (भार) गुरुचरणांवर ठेवल्याने प्रतिक्रिया येणे बंद होणे आणि सहनशीलता वाढून परमेश्वराच्या जवळ जाता येणे
माझा कोणी अपमान केला किंवा मला त्रास दिला की, पूर्वी माझ्या मनात प्रतिक्रिया येत असत. आता मी प्रपंचाचे कोडे (भार) गुरुचरणांवर ठेवल्याने मला प्रतिक्रिया येणे बंद झाले. उलट माझ्या मनात ‘भगवंताने केला आमचा सन्मान, गुरूंच्या ओटी घालून केला मानपान’ हा विचार दृढ झाला. (नातेवाइकांनी दूर केले, तरी गुरु (परात्पर गुरु डॉ. आठवले) आमच्या जीवनात आले. त्यांनी आम्हाला जवळ केले, हे आमचे भाग्य आहे.) आता मला वाटते, ‘मला त्रास देणार्या किंवा माझा अपमान करणार्या व्यक्ती माझ्या गुरु आहेत; कारण त्यांना प्रतिक्रिया न दिल्याने माझी सहनशीलता वाढून मी आनंदमयी परमेश्वराच्या जवळ जात आहे.’
३. भगवंत स्वतःकडे काहीच ठेवत नाही, उलट भक्ताला सव्याज परत करतो
माझ्या जीवनाचा विमा भगवंताने उतरवला आहे. त्याचा माझ्या मृत्यूच्या पश्चात अन्य कुणालाही नाही, तर मलाच लाभ होणार आहे. देवानेच माझ्याकडून भक्तीरूपी हप्ते भरवून घेतले आहेत. ते तो मला सव्याज परत करील; कारण देव स्वतःकडे काहीच ठेवत नाही. भक्त भगवंताला जे देतो, ते भगवंत भक्ताला सव्याज परत करतो. तेव्हा ‘स्वीकारणे किंवा नाकारणे’ असा प्रश्नच येत नाही.’
– सौ. शकुंतला बद्दी (वय ६० वर्षे), खारघर, नवी मुंबई. (२९.११.२०२२)