नागरिकांसह विविध संस्था, संघटना यांच्या सहभागाने श्रीरामनामाचा भव्य जागर होणार !

पिंपरी – अयोध्येमध्ये २२ जानेवारी २०२४ या दिवशी श्रीराममंदिराचे लोकार्पण होणार आहे. या सोहळ्याचे शहरात विविध कार्यक्रम आणि उपक्रम यांच्या माध्यमातून स्वागत करणार आहे, अशी माहिती विश्व हिंदु परिषदेचे पुणे विभाग मंत्री नितीन वाटकर यांनी दिली आहे. शहरातील विविध सामाजिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक, सेवाभावी, विविध ज्ञाती संस्था, सार्वजनिक उत्सव मंडळे, राजकीय पक्ष संघटनांच्या प्रमुख पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत यासंदर्भातील बैठक पार पडली. ‘माझे गाव, माझी आयोध्या’ या संकल्पने अन्वये सर्व भाविकांनी आपल्या परिसरात, घरोघरी धार्मिक अनुष्ठान, नामसंकीर्तन करत स्थानिक मंदिरात आरती करावी, प्रसाद वितरण करावा, परिसर रांगोळ्या काढून, घरांवर भगवे ध्वज आणि पताका लावून सुशोभित करावा. सायंकाळी घरासमोर किमान ५ दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करावा, असे आवाहन विश्व हिंदु परिषदेने केले आहे. या बैठकीला शहरातील विविध संस्था, संघटनांचे २५० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक विश्व हिंदु परिषदेचे नितीन वाटकर यांनी केले, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह महेश्वर मराठे यांनी समारोप केला.