कार्तिक कृष्ण द्वितीया (२९.११.२०२३) या दिवशी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांचा ४५ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांच्या समवेत सेवा करणार्या साधकांना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. श्री. नीलेश अच्युत जोशी, दादर, मुंबई
१ अ. कुशाग्र बुद्धीमत्ता आणि स्मरणशक्ती : ‘अधिवक्ता वीरेंद्र यांची स्मरणशक्ती अफाट आहे. मला वाटते, ‘गुरुकृपेने त्यांना हे मोठे वरदान मिळाले आहे.’ ते करत असलेल्या सेवांच्या संदर्भात जवळजवळ ‘मागील १० वर्षांपासून काय आणि कसे घडले आहे ?’, याविषयी त्यांच्या स्मरणात आहे. न्यायालयीन सेवा करतांना त्यांच्या वाचनात आलेली जवळपास सर्व सूत्रे त्यांच्या लक्षात आहेत. एखादी सेवा करतांना काही संदर्भ हवा असल्यास वीरेंद्रदादा त्याविषयी क्षणार्धात सांगू शकतात. त्यामुळे आमचा संदर्भ शोधण्यातील वेळ वाचतो.
१ आ. काटकसरी : ते कागदांचा वापर काटकसरीने करतात. त्यांचे कोर्या-पाठकोर्या कागदांची वर्गवारी करून त्याचा वापर करणे, कागदांचे वेगवेगळ्या आकारांमध्ये तुकडे करणे, तसेच ‘कोणतेही साहित्य विनावापर रहाणार नाही’ याची काळजी घेणे, यांकडे कटाक्षाने लक्ष असते. ते वापरत असलेल्या सर्वच साहित्याविषयी ‘ते चांगले कसे राहील’ आणि ‘अधिक काळ कसे वापरता येईल’, असा त्यांचा प्रयत्न असतो.
१ इ. सेवेच्या प्रचंड तळमळीमुळे ईश्वराचे साहाय्य सतत लाभणे : दादांमध्ये ते करत असलेल्या सेवांप्रती अपार कृतज्ञताभाव दिसून येतो. त्यांच्यामध्ये सेवेची प्रचंड तळमळ आहे. अनेक वेळा प्रवास करून आल्यावर ते लगेच पुढील सेवा करतात. ते ‘वेळ वाया जाणार नाही’, असा प्रयत्न करतात. ते करत असलेल्या सेवा समयमर्यादेत पूर्ण करणे आवश्यक असते. त्यांच्या मनात ‘सेवेत आणखी काय करू शकतो ? किंवा काय केल्याने ते उपयुक्त ठरेल’, असा विचार सतत असतो. त्यांच्या या तळमळीमुळेच ‘ईश्वरच त्यांना वेगवेगळ्या गोष्टी सुचवतो आणि त्यांना आवश्यक असलेले सर्व साहाय्य वेगवेगळ्या माध्यमांतून करतो’, असे मला जाणवते. काही संदर्भ शोधतांना अतिशय महत्त्वाचे न्यायालयीन निवाडे, संदर्भ किंवा अतिशय उपयुक्त माहिती त्यांना अल्प कालावधीत एवढ्या प्रचंड माहितीजालामधून मिळते.
२. अधिवक्त्या श्रुती भट (वय ६१ वर्षे), दादर, मुंबई.
२ अ. साधकांना प्रोत्साहन देणे : ‘आमच्याकडून सेवा चांगली झाल्यास ते ‘‘छान केले’’, असे म्हणून आमचा सेवेतील उत्साह वाढवतात.
२ आ. तत्त्वनिष्ठ : ते आमच्याकडून झालेल्या चुका स्पष्टपणे सांगतात.’
३. अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी, अंबरनाथ, ठाणे
अ. ‘वीरेंद्रदादा सेवा सहजतेने आणि एकाग्रतेने करतात.
आ. ते सेवेत बुद्धीचा वापर समर्पित भावाने करतात.’
४. अधिवक्त्या प्रीती पाटील, सांगली
४ अ. नम्र : ‘दादा नम्रतेने बोलतात.
४ आ. त्यांचे न्यायालयीन लिखाण सूत्रबद्ध असते.
४ इ. साधकांना साहाय्य करणे
१. दादांची साधकाला साहाय्य करण्यासाठी कष्ट घेण्याची सिद्धता असते.
२. दादांमध्ये उत्तम नेतृत्वगुण आहे. एका सेवेच्या वेळी माझी स्थिती पाहून दादांनी मला सांगितले, ‘‘सेवेचे दायित्व घेतले, तर संघर्ष हा होणारच. त्या संघर्षाकडे शिकण्याच्या स्थितीत राहून पाहिले, तर साधना होईल !’’
४ ई. सेवाभाव
१. कितीही किचकट सेवा असली, तरीही दादा ती सहजतेने करतात.
२. दादांचे ‘सेवा परिपूर्ण आणि गुरुमाऊलींना अपेक्षित अशी करायची’, असे ध्येय असते. त्यामुळे दादा विषयाशी एकरूप होऊन सेवा करतात.
३. ‘साधना म्हणून मला ही सेवा करायची आहे’, असा त्यांचा भाव असतो.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १८.९.२०२३)