निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २६०
१. कोजागरीचा शीतल चंद्र
‘कोजागरी पौर्णिमेला मध्यरात्री चंद्र माथ्यावर असतांना गच्चीत बसून दूध पिणे मनाला किती आल्हादकारक असते’, याचा अनुभव काही जणांनी घेतला असेलच. साधारणपणे ऑक्टोबर मासात येणार्या शरद ऋतूतील गरमीमध्ये रात्रीच्या वेळी चंद्रामुळे आलेला गारवा पुष्कळ सुखकारक असतो. ‘शीतलता’ हा चंद्राचा गुण आहे.
२. जिथे जिथे ‘शीतलता’ आणि ‘स्थिरता’आहे, तिथे तिथे कफ असतो
शरिरात चंद्राची हीच भूमिका कफ बजावत असतो. शरीर प्रमाणापेक्षा जास्त गरम होऊ न देणे, शरिराच्या वाढीसाठी मुख्य घटक (बिल्डिंग ब्लॉक्स) पुरवणे, शरीर, तसेच मन यांना स्थिरता आणणे, शरिरात जिथे जिथे घर्षण होते, तिथे तिथे वंगण पुरवणे ही कफाची मुख्य कार्ये आहेत. सांध्यांमधील द्रव, फुप्फुसांमध्ये, तसेच श्वास नलिकांमध्ये असलेला ओलावा, सतत चालणार्या हृदयाच्या बाहेर असलेला, तसेच मेंदूच्या सभोवताली असलेला द्रव, आतड्यांना मल न चिकटता सहज बाहेर पडावा, यासाठी आतड्यांना आतून असलेला बुळबुळीत पदार्थ (म्युकस) या सर्वांमध्ये कफ प्राधान्याने असतो.
३. शरीर घटकांना एकत्र बांधणारा कफ
कणिक भिजवतांना तिच्यात जे पाणी घातले जाते, त्या पाण्यामुळे कणकेचे अणू एकमेकांना चिकटून राहतात, म्हणजेच त्यांचा बंध तयार होतो. कफ कणकेतील पाण्याप्रमाणे शरिरातील घटकांना एकत्र बांधण्याचे कार्य करतो’.
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.११.२०२३)
लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी मार्गिका : bit.ly/ayusanatan