‘परिणमन’कर्ता (रूपांतर करणारा) सूर्य

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २५९

१. ऊर्जेचे परिणमन

‘आपण लहानपणी शाळेत अन्न साखळी शिकलेलो आठवते का ? काय होते तिच्यामध्ये ? पृथ्वीवर ऊर्जा सूर्यापासून मिळते. झाडांमध्ये ही ऊर्जा अन्नधान्य, फळे या रूपांत रूपांतरित होते. ससा, हरीण, बकरी, गाय यांसारखे शाकाहारी प्राणी झाडांकडून सूर्याची ऊर्जा घेतात. कोल्हा, वाघ यांसारखे मांसाहारी प्राणी इतर प्राण्यांना खाऊन जगतात. प्राण्यांच्या विष्ठेवर असंख्य सूक्ष्म जीवजंतू गुजराण करत असतात. हे जीवजंतू झाडांना पोषक असतात इत्यादी. थोडक्यात अन्न साखळीचा मूळ स्रोत सूर्य आहे आणि या साखळीमध्ये सूर्याच्या ऊर्जेचे ‘परिणमन’, म्हणजेच ‘रूपांतर’ होत असते.

२. ऊब

सूर्य आहे, म्हणून उष्मा (ऊब) आहे. ‘उष्मा’ किंवा ऊब देणे हे सूर्याचेच कार्य आहे. पृथ्वीच्या उत्तर किंवा दक्षिण ध्रुवाच्या प्रदेशात, तसेच हिमालयासारख्या उंच पर्वतांवर सूर्याची पुरेशी ऊब पोचत नाही. त्यामुळे ते प्रदेश नेहमी बर्फाच्छादित असतात. आपण तिथे विशिष्ट ऊबदार कपड्यांविना जाऊच शकत नाही.

वैद्य मेघराज पराडकर

३. प्रकाश

सूर्य आहे, म्हणून प्रकाश आहे आणि तो आहे, म्हणूनच आपण हे जग पाहू शकतो. जग ‘प्रकाशित’ करणे (डोळ्यांना दाखवणे) हे सूर्याचे तिसरे काम.

४. जिथे जिथे ‘परिणमन’ (रूपांतर), तिथे तिथे ‘पित्त’

सूर्याचा शरिरातील प्रतिनिधी ‘पित्त’. खाल्लेल्या अन्नाचे पचन करणे, शरिराचा उष्मा राखून ठेवणे (शरिराची ऊब राखून ठेवणे), तसेच ‘दृष्टी’ हे पित्ताचे कार्य आहे. थोडक्यात जिथे जिथे ‘परिणमन’ किंवा रूपांतर तिथे तिथे ‘पित्त’ !’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.११.२०२३)

लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी मार्गिका : bit.ly/ayusanatan