शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी मुंबई मनपाचे आयुक्त आणि प्रशासक इकबाल सिंह चहल यांना मुंबईतील भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर प्रकाश टाकणारे पत्र लिहिले आहे. या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी भटक्या कुत्र्यांसाठी मुंबईत निवारागृह बांधण्याची मागणी पत्रात केली आहे. भटक्या कुत्र्यांचा कित्येक वर्षांपासून नागरिकांना होणारा त्रास सर्वश्रूत आहे. त्याचेच ‘निवारण’ करायचे असतांना त्यांना ‘निवारा’ देऊन त्यांचे पालन-पोषण करण्यासारखे तर होणार नाही ना ?, असा प्रश्न काहींना पडला आहे.
भटक्या कुत्र्यांकडून चावा घेण्याच्या तब्बल ६५ सहस्रांहून अधिक घटनांची नोंद मुंबईत प्रतिवर्षी होते. एका अभ्यासानुसार ८२ टक्के लोकांवर त्यांच्या शेजारच्या भागातील भटक्या कुत्र्यांनी आक्रमण केल्याची माहिती समोर आली आहे.
दिवस असो वा रात्र मुंबईतील उपनगरांतील गल्ल्यांत भटक्या कुत्र्यांची दहशत असतेच. त्यांची संख्या वाढल्याने त्यांचा उन्मादही वाढला आहे. त्यांना पकडण्यासाठी मुंबई मनपाच्या वतीने श्वानपथक ‘डॉग व्हॅन’मधून फिरत असते. हे वाहन पाहिल्यावर कुत्रे पळून जातात आणि ते गेल्यावर पुन्हा येतात ! या पथकाने काही कुत्रे पकडून नेले, तरी बरेच कुत्रे मोकाट फिरत असतात. ‘रहात्या विभागात रस्त्यांवर कुत्रे असले की, भुरट्या चोरांपासून रक्षण होते. कुत्र्यांच्या भीतीने तरी चोर त्या भागात चोरी करण्यासाठी जाण्याचा विचार करणार नाहीत. त्यामुळे अधिक नव्हे; पण काही प्रमाणात तरी ‘भटके कुत्रे पाहिजेत’, असा काही लोकांचा विचार आहे ! काही लोक तर चक्क या कुत्र्यांना विविध पदार्थ खायलाही देत असतात. ‘आजपर्यंत अनेकांच्या प्राणांवर बेतलेले कुत्र्यांचे चावणे आणि त्यामुळे होणारा शारीरिक, मानसिक त्रास म्हणजे काय ?’, याची जाण नसणे आणि तशी मानसिकताही नसणे’ यांमुळे भटक्या कुत्र्यांमुळे इतरांना होणार्या त्रासाचे त्यांना अजिबात सुवेरसूतक नसते. बलवान माणूसही कुत्र्यांच्या घोळक्याने अंगावर झडप घातल्यावर हतबल होतो; तिथे लहान मुलांचे काय होत असेल ?
लहान मुले यांचा प्रतिकार करू शकत नसल्याने ती यांचे सहज लक्ष्य होतात आणि प्रसंगी प्राणालाही मुकतात. भारत विविध क्षेत्रांत वेगाने प्रगती करत आहे; मात्र अद्याप भटक्या कुत्र्यांची समस्या पूर्णतः सुटू न शकल्याने प्रतिदिन नागरिकांना या प्राणघातक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. ‘भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या लक्षात घेता शहरे, उपनगरे येथे कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याच्या प्रक्रियेला गती येणे, त्यासाठी अधिक केंद्र उभारणे आणि त्याच्या फलनिष्पत्तीचा आढावा घेणे आवश्यक आहे’, असे वाटते !
– श्री. जयेश राणे, भांडुप, मुंबई.