तणावमुक्तीसाठी भगवंताचे नामस्मरण करायला हवे ! – पुरुषोत्तम महाराज पाटील, कीर्तनकार

आळंदी येथील ‘संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीदिन सोहळ्या’निमित्त कीर्तन महोत्सव !

पिंपरी (जिल्हा पुणे) – सध्याच्या काळात प्रत्येकजण तणावात आहे. १०० टक्के निरोगी कुणीच नाही. त्यावर एकच औषध आहे, ‘रामकृष्णहरि’ नामस्मरण. हा वारकरी संप्रदायाचा मूलमंत्र आहे. यातील रामाचा विचार, कृष्णाचा आचार आणि हरीचा उच्चार करा, त्यामुळे तणावातून मुक्तता मिळेल. त्यासाठी श्रद्धेने भगवंताचे नामस्मरण करायला हवे, अशी भावना आळंदी येथील कीर्तनकार पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी व्यक्त केली. पंढरपूर येथील कार्तिकी वारी, आळंदी येथील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीदिन सोहळा आणि ‘सकाळ’ पिंपरी-चिंचवडचा ३१ वा वर्धापनदिन यांनिमित्त ‘कीर्तन महोत्सव’ आयोजित केला आहे. त्याअनुषंगाने महोत्सवाच्या तिसर्‍या दिवसाची कीर्तनसेवा आकुर्डी प्राधिकरणातील गदिमा नाट्यगृहात पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी केली.

पुरुषोत्तम महाराज पाटील म्हणाले की, संत ज्ञानेश्वर माऊली यांनी ज्ञानाच्या माध्यमातून सर्वांना उपदेश केला; म्हणून ते वयापेक्षा ज्ञानाने श्रेष्ठ ठरतात. माऊली हे ज्ञानियांचे ज्ञानी आहेत. मुक्तपणे आपल्या माणसांजवळ व्यक्त व्हा. मोकळेपणाने बोला. त्यामुळे मानसिक ताण अल्प होतो. सध्या आपण घरातल्या घरात तसेच शेजार्‍यांशी बोलत नाही; पण मनःशांती मिळण्यासाठी सर्व जुने विसरून एकमेकांशी बोला, असे आवाहनही त्यांनी केले.