High GDP India : आर्थिक मंदीच्या छायेत असलेल्या जगात भारताची आर्थिक घोडदौड !

  • वर्ष २०२३ मध्ये ६.३ टक्क्यांनी वधारणार भारतीय अर्थव्यवस्था !

  • अमेरिकी अर्थव्यवस्था २.१ टक्क्यांनी, तर चीनची ५ टक्क्यांनी वाढणार !

नवी देहली – अमेरिका आणि युरोप यांवर आर्थिक मंदी लटकती तलवार आहे. दुसरीकडे चीनमध्येही भूमी खरेदी-विक्री क्षेत्रासह बँकिंग क्षेत्राच्या आर्थिक अडचणींमध्येही वाढ होत चालली आहे. असे असले, तरी भारतीय अर्थव्यवस्था गतीने वर जात असून वर्ष २०२३ मध्ये सर्वाधिक गतीने भारताची अर्थव्यवस्था वाढेल, असे निरीक्षण जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांसारख्या जागतिक आर्थिक संस्थांनी नोंदवले आहे. भारताची अर्थव्यवस्था ६.३ टक्क्यांनी वधारेल, असे सांगितले जात आहे. मोठ्या अर्थव्यवस्थांमध्येसुद्धा ही आकडेवारी सर्वाधिक आहे. जगात दुसर्‍या क्रमांकावर भारताचाच शेजारी देश बांगलादेश असून त्याची अर्थव्यवस्था ६ टक्क्यांनी वृद्धिंगत होईल.

१. दक्षिण अमेरिकी देश कोलंबिया ५.६ टक्के, फिलिपाईन्स ५.३ टक्के, चीन ५ टक्के, तर इंडोनेशियाची अर्थव्यवस्था ५ टक्क्यांनी वाढेल, असा अनुमान आहे.

२. युरोपीय देश तुर्कीयेची अर्थव्यवस्था ४ टक्क्यांनी वाढेल, तर संयुक्त अरब अमिरात ३.४ टक्के, मेक्सिको ३.२ टक्के आणि ब्राझिलची अर्थव्यवस्था ३.१ टक्क्यांनी वाढेल.

३. जगातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेच्या आर्थिक वृद्धीचे प्रमाण  २.१ टक्केच असेल. रशिया २.२ टक्के, कॅनडा १.३ टक्के, फ्रान्स १ टक्का, सौदी अरेबिया ०.६ टक्के, तर युनायटेड किंगडमची अर्थव्यवस्था केवळ ०.५ टक्क्यांनी वधारेल, अशी शक्यता आहे.

या देशांची अर्थव्यवस्था वाढण्यापेक्षा लहान होणार !

एकेकाळी विकसित देश असलेल्या अर्जेंटिनाची अर्थव्यवस्था खाली घसरणार आहे. यंदा तेथील प्रमाण हे उणे २.५ टक्के असेल. याप्रमाणेच एस्टॉनिया, स्वीडन, पाकिस्तान, जर्मनी, लिथुआनिया आणि फिनलँड यांच्या अर्थव्यवस्थाही वधारण्याऐवजी खालच्या दिशेला जातील. पाकिस्तानचे सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच जीडीपी यंदाच्या वर्षात ०.५ टक्क्यांनी वाढेल.