‘एकनाथी भागवत’ ग्रंथनिर्मितीची आगळी कथा, त्या कथेतून शिकायला मिळालेली उद्बोधक सूत्रे आणि ग्रंथ वाचनाने झालेला लाभ !

आज कार्तिक पौर्णिमा या दिवशी ‘एकनाथी भागवत’ हा ग्रंथ लिहून पूर्ण झाला. त्या निमित्ताने…

संत एकनाथ महाराज

नसलेल्याचे चिंतन करणे, म्हणजे ‘अतिचिंता’ आणि असलेल्याचे चिंतन करणे, म्हणजेच ‘निश्चिंतता’ होय !

‘एकनाथी भागवत’, ही ‘श्रीमद्भागवत’ या मूळ संस्कृत ग्रंथामधील ११ व्या स्कंदावर मराठी भाषेत लिहिलेली टीका आहे. येथे ‘टीका’ याचा अर्थ ‘मूळ संस्कृत भाषेत असलेली सूत्रे मराठी भाषेत अधिक स्पष्टपणे उलगडून सांगणे’, असा आहे. ज्याप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेवर मराठी भाषेत ज्ञानेश्वरी ही टीका लिहिली, त्याप्रमाणेच ‘एकनाथी भागवत’ ही श्रीमद्भागवतावरील टीका आहे. कार्तिक पौर्णिमा या दिवशी ‘एकनाथी भागवत’ हा ग्रंथ लिहून पूर्ण झाला. या ग्रंथाच्या निर्मितीची कहाणी मोठी रोचक आणि बोधप्रद आहे. मला या ग्रंथाप्रती वाटणारी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा लेखनप्रपंच !

‘एकनाथी भागवत’, ही ‘श्रीमद्भागवत’ या मूळ संस्कृत ग्रंथामधील ११ व्या स्कंदावर मराठी भाषेत लिहिलेली टीका आहे. येथे ‘टीका’ याचा अर्थ ‘मूळ संस्कृत भाषेत असलेली सूत्रे मराठी भाषेत अधिक स्पष्टपणे उलगडून सांगणे’, असा आहे. ज्याप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेवर मराठी भाषेत ज्ञानेश्वरी ही टीका लिहिली, त्याप्रमाणेच ‘एकनाथी भागवत’ ही श्रीमद्भागवतावरील टीका आहे. कार्तिक पौर्णिमा या दिवशी ‘एकनाथी भागवत’ हा ग्रंथ लिहून पूर्ण झाला. या ग्रंथाच्या निर्मितीची कहाणी मोठी रोचक आणि बोधप्रद आहे. मला या ग्रंथाप्रती वाटणारी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा लेखनप्रपंच !

आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत

१. ‘एकनाथी भागवत’ ग्रंथनिर्मितीची कथा !

१ अ. ‘श्रीमद्भागवतावर मराठीत टीका लिहिणे’, हा मोठा अपराध असणे : पैठण येथे संत एकनाथ महाराज प्रतिदिन श्रीमद्भागवतावर प्रवचन करीत असत. तत्कालीन संतांच्या आग्रहावरून त्यांनी श्रीमद्भागवताच्या ११ व्या खंडावर टीका लिहिण्यास आरंभ केला. नाथ (संत एकनाथ महाराज) प्रवचन करीत असतांना त्यांचे २ शिष्य ते लिहून घेत असत. असे सिद्ध झालेले २ अध्याय घेऊन त्यांचा एक शिष्य काशीला गेला. तिथे तो प्रतिदिन गंगेच्या मणिकर्णिका घाटावर बसून त्या अध्यायांचे पठण करू लागला. ते पठण ऐकायला लोक जमू लागले. तेथील मठाधिपतींच्या शिष्यांनी ते पाहिले आणि ‘संस्कृतमधील पवित्र ग्रंथ मराठीत सांगणे’, हा अपराध आहे’, असे सांगून त्यांनी नाथांच्या त्या शिष्याला मठाधिपतींसमोर उभे केले. मठाधिपतींनी त्याला असे करण्याचे कारण विचारले. तो शिष्य म्हणाला, ‘‘महाराष्ट्र्रातील पैठणनिवासी माझे गुरु संत एकनाथ महाराज यांनी हे लिखाण केले आहे.’’

१ आ. संत एकनाथ महाराज यांनी जनसामान्यांना कळण्यासाठी ग्रंथ मराठीत लिहिणे : मठाधिपतींनी नाथांनाच याविषयी विचारायचे ठरवले. त्यांनी आपल्या २ शिष्यांकडून नाथांना एक पत्र पाठवून त्यांना काशीक्षेत्री यायला सांगितले. तोपर्यंत नाथांचे ५ अध्याय लिहून पूर्ण झाले होते. मठाधिपतींकडून मिळालेल्या आदेशानुसार नाथ काशीला त्या मठाधिपतींना भेटायला गेले. तेव्हा मठाधिपतींनी ‘नाथांचे तोंड पहायला नको’; म्हणून दोघांच्या मध्ये पडदा लावला. नाथांनी त्यांना विचारले, ‘‘आपण बोलावले; म्हणून मी एवढ्या लांबून आलो आणि आपण मला दर्शनही देत नाही, असे का ?’’ मठाधिपती उत्तरले, ‘‘तू एवढा मोठा पवित्र ग्रंथ मराठीत लिहीत आहेस. हा देववाणीचा (संस्कृतचा) द्रोह आहे. तू पाखंडी आहेस आणि पाखंड्याचे तोंड पाहू नये; म्हणून हा पडदा लावला आहे.’’ तेव्हा नाथ म्हणाले, ‘‘श्रीमद्भागवतातील बोध सामान्यांना समजावा आणि त्यांचे कल्याण व्हावे; म्हणून मी याचे मराठीत लेखन केले आहे. संस्कृत ही देववाणी आणि मराठी काय चोरवाणी आहे का ? तीही देवापासूनच आली आहे ना ? तुम्हाला ज्यांना बोलवायचे आहे, त्यांना बोलवा. मी लिहिलेल्या अध्यायांचे वाचन करतो. ‘मी जे लिहिले आहे, ते चुकीचे आहे का ?’, ते पहावे. ‘मी चुकीचा अर्थ लावला आहे’, असे ऐकणार्‍यांना वाटले, तर मीच हा ग्रंथ गंगेत बुडवून टाकीन.’’

१ इ. काशीतील विद्वानांना टीका आवडल्यामुळे त्यांनी उर्वरित ग्रंथ काशीतच पूर्ण करण्यास सांगणे : नाथांनी काशीक्षेत्रातील सर्व विद्वान, वेदशास्त्रसंपन्न पंडित, तपस्वी आदींसमोर त्यांनी लिहिलेल्या ५ ही अध्यायांचे वाचन केले. सर्वांना ते फारच आवडले. त्यामुळे सगळ्यांनी नाथांकडे आग्रह धरला, ‘तुम्ही हा ग्रंथ काशीक्षेत्री राहूनच पूर्ण करावा.’ नाथांनी तो आग्रह शिरसावंद्य मानून काशीक्षेत्री राहून या ग्रंथाचे लेखन पूर्ण केले. या लेखनपूर्तीचा दिवस होता शके १४९५, कार्तिक पौर्णिमा !

२. संत एकनाथ महाराज यांची नम्रता आणि लोकांनी ग्रंथाचे ‘एकनाथी भागवत’ असे केलेले नामकरण !

पूर्ण ग्रंथ ऐकून मठाधिपतींना पुष्कळ आनंद झाला. मठाधिपतींनी सांगितले, ‘‘नाथांची हत्तीवरून मिरवणूक काढा.’’ नाथांना स्वतःची अशी मिरवणूक काढणे पसंत नव्हते. नाथ म्हणाले, ‘‘माझी नको. ग्रंथाची मिरवणूक काढा. ‘तुम्ही पायी चालत असतांना मी हत्तीवर बसण्याएवढा माझा अधिकार नाही.’’ त्या दिवशी काशीमध्ये या ग्रंथाची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. नाथांनी या ग्रंथाला ‘एकाकार टीका’, असे नाव दिले; पण लोकांनी त्याचे नाव ‘एकनाथी भागवत’, असे केले.

३. ‘एकनाथी भागवत’ या ग्रंथाच्या निर्मितीकथेतून प्राप्त झालेला बोध !

अ. संत एकनाथ महाराज यांनी श्रीमद्भागवतातील संस्कृतमध्ये उपलब्ध असणारे पारमार्थिक ज्ञान मराठी भाषेत आणले. त्यामुळे सामान्यजनांना त्याचा लाभ झाला आणि त्याच समवेत मराठी भाषा अधिक समृद्ध झाली. नाथांनी ‘मूळ ग्रंथातील कठीण संकल्पनांचे विवरण करून त्या सामान्यजनांना समजतील’, असे त्याचे लेखन केले.

आ. धर्माचार्यांनी ‘पारमार्थिक ज्ञानार्जनासाठी ‘संस्कृत’ हीच माध्यमभाषा असायला हवी’, ही चालत आलेली परंपरा पालटली जात आहे का ?’, असे वाटून प्रथम नाथांना विरोध केला; परंतु त्यासाठी त्यांनी परस्पर आज्ञा काढून नाथांना दंड केला नाही. त्यांनी नाथांना त्यांचे म्हणणे मांडायला बोलावले.

इ. तत्कालीन विद्वानांनी नाथांचे हे लेखन ऐकून अत्यंत मोकळेपणाने ‘लिखाण अतिशय चांगले झाले आहे’, अशी मान्यता दिली आणि नाथांना ‘काशीत राहूनच ग्रंथ पूर्ण करा’, असा आग्रह करून गुणग्राहकताही दर्शवली.

ई. विद्वानांनी ‘नाथांची हत्तीवरून मिरवणूक काढावी’, असे सांगितल्यावर नाथांनी ‘माझी नको, या ग्रंथाची काढा’, असे सांगितले. यातून नाथांची विनम्रता दिसून आली.

या कथेतून स्पष्ट झालेली ‘आक्षेपासंबंधी संवाद साधणे, सहिष्णुता, गुणग्राहकता, विनम्रता इत्यादी मूल्ये सनातन धर्माची संस्कृती ही खर्‍या अर्थाने ज्ञानसंस्कृती आहे’, हे अधोरेखित करतात.

४. एकनाथी भागवताच्या अल्प वाचनातून साधनेसाठी झालेला लाभ ! 

४ अ. मनात सतत पुष्कळ विचार येत असणे आणि ते थांबवता न येणे : माझ्या मनात ‘राष्ट्र, सेवा, अन्य कार्य किंवा व्यक्तिगत जीवनातील विविध प्रसंग किंवा प्रश्न’ यांविषयी सतत विचार चालू रहात असत. त्यातील काही विचारांविषयी ‘हे विचार अनावश्यक आहेत’, हे मला समजत असे; परंतु ते मला थांबवता येत नसत. काही विचारांविषयी ‘याविषयी विचार करण्यात काय चूक आहे ?’, असे वाटून ते विचार बंद होत नसत, तर मनातील काही विचारांनुसार कृती केली, तरी ते विचार पुन्हा मनात येत असत. ‘साधनेच्या दृष्टीने हे सर्व निरर्थक आहे’, हे माझ्या लक्षात आले, तरी ते विचार घालवण्यासाठी मला बळ मिळत नव्हते.

४ आ. मनाला ‘निश्चिंतता’ देणारे ‘ईशचिंतन’ ! : या ग्रंथात पुढे दिलेली एक ओवी आहे.

नाथिलें चिंती ते ‘अतिचिंता’ । आथिलें ते ‘निश्चिंतता’ ।
आथी नाथी सांडिली चिंता । सहजें न भजतां भजन होये ।।

                          – एकनाथी भागवत, अध्याय २, ओवी ४२१

अर्थ : नसलेल्याचे चिंतन करणे, म्हणजे ‘अतिचिंता’ आणि असलेल्याचे चिंतन करणे, म्हणजेच ‘निश्चिंतता’ होय; पण ‘आहे’ आणि ‘नाही’ या दोन्ही भावांचे चिंतन करणे सोडून दिल्यावर न भजतांही भजन घडते.

या ओवीमुळे मला अकस्मात् बोध झाला. ‘नाथिले’, म्हणजे ‘नसलेल्याचा’, म्हणजे ‘जे सर्व मिथ्या आहे, त्याचा’, म्हणजेच माझ्या मनात येणारे बहुतेक विचार ध्येयाच्या दृष्टीने केवळ निरर्थकच नाहीत, तर ‘अतिचिंता’ आहेत’, याचे मला आकलन झाले. त्याऐवजी ‘आथिलें’, म्हणजे ‘सत्चे’ चिंतन, म्हणजे ‘ईशचिंतन’ केवळ आवश्यकच नसून ते ‘निश्चिंतता’ देणारे आहे’, याचेही मला आकलन झाले.   त्यानंतर काही दिवस ही ओवी पुनःपुन्हा माझ्या मनात येत राहिली. तिच्या आधारे मनातील विचारांकडे पाहिल्यामुळे माझ्या मनातले विचार न्यून व्हायला मोठे बळ मिळाले आणि या ओवीच्या पुढच्या भागाचा म्हणजे, ‘आथी नाथी सांडिली चिंता । सहजें न भजतां भजन होये ।।’, याचा अर्थ समजला !
।। श्रीगुरुचरणार्पणमस्तु ।।’

– आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.  (११.११.२०२३)