वाराणसी येथील हिंदु जनजागृती समिती आयोजित प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनातील घटना !
वाराणसी (उत्तरप्रदेश) – धर्मांधांकडून ठार मारण्याच्या धमक्यांची पर्वा न करता आयुष्यभर अविवाहित राहून धर्म आणि राष्ट्र यांची सेवा म्हणून गोमाता अन् सनातन धर्म यांचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा जालौन येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. पवन द्विवेदी यांनी केली आहे. वाराणसी येथे नुकत्याच पार पडलेल्या प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात श्री. पवन द्विवेदी आणि त्यांचे कुटुंबीय यांचा हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी भगवान श्रीकृष्णाची प्रतिमा अन् भेटवस्तू देऊन सत्कार केला. याप्रसंगी व्यासपिठावर पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन आणि सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस उपस्थित होते. या अधिवेशनाला श्री. पवन द्विवेदी यांचे बंधू सर्वश्री पुष्पेंद्र, दीपेंद्र, शिवम द्विवेदी, तसेच त्यांची आई सौ. साधना द्विवेदी आणि वडील श्री. राजेंद्र बहाद्दूर द्विवेदीही उपस्थित होते. हे कुटुंब त्यांच्या कार्याचे संपूर्ण श्रेय भगवान शंकराला देतात. राष्ट्र-धर्माच्या कार्यात सहभागी झाल्याविषयी त्यांना ईश्वराविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटते.
या वेळी सत्काराविषयी मनोगत व्यक्त करतांना श्री. पवन द्विवेदी म्हणाले, ‘‘जे या पृथ्वीवर आले आहेत, त्यांचा मृत्यू अटळ आहे; परंतु जो या भीतीतून बाहेर पडून राष्ट्र आणि धर्म यांसाठी काही करतो, तोच अमर होतो आणि अन् अन्य सर्व नष्ट होतात.’’
पवन द्विवेदी यांचा परिचय
श्री. पवन द्विवेदी आणि त्यांचे कुटुंब जालौन जिल्ह्यातील कदौरा शहरात रहातात. तेथे धर्मांधांची लोकसंख्या ८० टक्क्यांहून अधिक आहे. तेथे धर्मांधांची दहशत शिगेला पोचली असून गोहत्या, हिंदूंचे शोषण आणि हिंदूंवरील आक्रमणे सातत्याने होत आहेत. कदौरा येथील सर्व हिंदू धर्मांधांचा त्रास शांतपणे सहन करत आहेत. अशा स्थितीत श्री. द्विवेदी आणि त्यांचे कुटुंबीय यांनी हिंदु धर्मावरील आक्रमणांच्या विरुद्ध लढणे, हे त्यांच्या जीवनाचे ध्येय बनवले आहे. त्यांनी घेतलेल्या ध्येयांवरून लक्ष विचलित होऊ नये; म्हणून ४ भावांनी चित्रकूट येथे देवी मंदाकिनीच्या साक्षीने आयुष्यभर अविवाहित राहून धर्माची सेवा करण्याची शपथ घेतली. यासाठी त्यांच्या आई-वडिलांनीही त्यांना पूर्ण साथ दिली. धर्मकार्य करत असतांना धर्मांधांकडून द्विवेदी कुटुंबातील सदस्यांवर अनेक आक्रमणे झाली. या आक्रमणांपासून स्वतःसह कुटुंबियांचे रक्षण करण्यासाठी त्यांना पुष्कळ संघर्ष करावा लागला.
शिवम द्विवेदी
(पवन यांचा लहान भाऊ) यांचा परिचय
शिवम वयाच्या ५ व्या वर्षापासून त्याच्या कुटुंबाला राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी प्रेरित करत होता. तो स्वत: ‘सॉफ्टवेअर अभियंता’ असून त्याने ‘विप्रो’सारख्या मोठ्या आस्थापनामध्ये काम केले आहे.
श्री. पवन द्विवेदी देत असलेला लढा आणि वैशिष्ट्यपूर्ण कार्य१. कदौराच्या मध्यभागी असलेल्या ८ बिघा तलावाच्या ठिकाणी धर्मांधांनी अतिक्रमण करून घरे बांधली आहेत. ते त्याच तलावात गायींची कत्तल करत होते. श्री. द्विवेदी यांनी तलावाच्या सर्व शासकीय नोंदी शोधून काढल्या. त्यानंतर या अतिक्रमणामुळे पर्यावरणाचा र्हास होत असल्याचे राष्ट्रीय हरित लवादाच्या लक्षात आणून दिले. परिणामी लवादाने उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. त्यानंतर ऑगस्ट २०२१ मध्ये धर्मांधांनी तलावामध्ये अनधिकृतपणे बांधलेली अनुमाने २५० घरे पाडण्यात आली, तसेच अतिक्रमण करणारे आणि नगराध्यक्ष यांना २.२५ कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. २. कदौरा शहरातील धर्मांधांचा परिसर ईदगाह कोठाराच्या भूमीवर १०० टक्के वसलेला होता. तेथे अनुमाने ७२ धर्मांधांनी २०० हून अधिक घरे बांधली होती. त्या घरांना पालिकेकडून अधिकृत करून घेतले होते. त्याविरुद्ध न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट करण्यात आली. अलाहाबाद उच्च न्यायालयाने धर्मांधांच्या या वस्तीला अनधिकृत समजून ते पाडण्याचे आदेश दिले. सध्या ते पाडण्याची प्रक्रिया चालू आहे. ३. जिहादींच्या उत्पन्नाचा मांस व्यापार हा एक महत्त्वाचा स्रोत आहे. उत्तरप्रदेशात मांसाची लाखो दुकाने परवान्याविना चालू आहेत. त्यांच्याविषयी माहिती अधिकाराच्या अंतर्गत पुरावे गोळा करून राष्ट्रीय हरित लवादाकडे जनहित याचिका प्रविष्ट केली. या याचिकेवर लवादाने परवाना नसलेली मांस दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यासमवेत येथे अनेक अनधिकृत पशूवधगृहे आढळून आली आहेत. त्यांनाही बंद करण्याचे कायदेशीर स्तरावर प्रयत्न चालू आहेत. |