पुणे – बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचा पुणे येथील संगमवाडी परिसरात भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी ३ दिवसीय सत्संग आणि दरबार आयोजित केला होता. या वेळी ‘अशास्त्रीय, दिशाभूल करणारे आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे वक्तव्य धीरेंद्रकृष्ण शास्त्री सतत करत असून त्याची पुनरावृत्ती पुण्यातही झाली आहे’, असा आरोप करत धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्यावर गुन्हा नोंद करा, अशी मागणी अंनिसकडून करण्यात आली आहे. महाराष्ट्र अंनिसने मागण्यांचे निवेदन पोलीस प्रशासनाला दिले आहे.
वर्दीत असणारे पोलीस अधिकारी हे धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या दरबारात जाऊन त्यांच्यापुढे नतमस्तक झाले. त्यांनी अशास्त्रीय पद्धतीने समस्यांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न केला असून त्यांचे दरबारात जाणे, हे महाराष्ट्र सेवा अधिनियम आणि तत्सम कायद्यांचा भंग करणारे आहे. त्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा नोंद करून कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.