‘एकदा सत्संगात एका साधकाने परात्पर गुरु डॉक्टरांना एक प्रश्न विचारला. त्यावर परात्पर गुरु डॉक्टरांनी उत्तर दिले आणि त्याला सांगितले, ‘‘हे उत्तर तुझ्यापुरते मर्यादित ठेव. हा विषय इतरांना सांगणे आवश्यक नाही. तो अन्यत्र सांगू नको.’’ त्या वेळी माझ्या मनात प्रश्न आला, ‘परात्पर गुरु डॉक्टर एरव्ही असे काही बोलत नाही. त्या साधकाला ‘अन्यत्र सांगू नको’, असे का सांगितले असेल ?’ थोड्या वेळाने माझ्या मनात पुढील विचार आपोआप आले, ‘त्या साधकाची प्रकृती अनावश्यक विषय ७ – ८ ठिकाणी सांगण्याची आहे. हे परात्पर गुरु डॉक्टरांना स्थुलातून कुणी सांगितले नव्हते. ते त्यांनी अंतर्ज्ञानाने जाणले होते; म्हणून त्यांनी त्या साधकाला तसे मार्गदर्शन केले.’ यावरून ‘परात्पर गुरु डॉक्टरांचे कुठलेही वाक्य उगाचच नसते. त्यामागे काहीतरी कारण असते’, हे या प्रसंगावरून माझ्या लक्षात आले.’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.५.२०२३)