नैसर्गिक आपत्तींचा सामना कसा करावा ?

पूरप्रसंगी घ्यावयाची दक्षता

१. प्रशासनाच्या वतीने ध्वनीवर्धक, आकाशवाणी आणि दूरदर्शन यांवरून देण्यात येत असलेल्या अद्ययावत संकटकालीन सूचना सतत ऐकत अन् पाहत रहाव्यात.

२. मौल्यवान वस्तू आणि महत्त्वपूर्ण कागदपत्रे सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. त्यामुळे ती सुरक्षित राहतील किंवा संकटकाळी घरातून निघतांना ती समवेत नेता येतील. त्यामुळे हानी होणार नाही किंवा झालीच, तर न्यूनतम होईल.

३. प्रथमोपचाराचे साहित्य आणि इतर आवश्यक साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवावे.

४. विद्युत उपकरणांच्या सर्व कळा (बटणे) बंद कराव्यात.

५. एखाद्या उंच ठिकाणी निघून जावे. घराला दुसरा माळा असेल, तर तेथे जावे.

पुरापासून वाचण्यासाठी उंचावर जातांना एकमेकांना आधार द्या !

भूकंप झाल्यावर काय करावे ?

१. लगेच स्वतःचे रहाते स्थान सोडून मोकळ्या जागेत जावे.

२. बहुमजली इमारतीतून खाली येण्यासाठी उद्वाहकाचा (लिफ्टचा) वापर करू नये.

४. पटल किंवा पलंग यांच्याखाली आश्रय घ्यावा. हातांनी डोके झाकून खोलीतील कोपरा किंवा छताच्या बीमच्या खाली बसावे. गॅस आणि वीज यांच्या सर्व कळा (बटणे) बंद कराव्यात.

५. तुम्ही घराबाहेर असाल, तर इमारती, विजेचे खांब आणि झाडे यांपासून दूर रहावे.

भूकंपग्रस्तांना तत्परतेने साहाय्य अन् घायाळांवर उपचार करा !

आपत्कालीन साहाय्य आणि भगवद्भक्ती !

नैसर्गिक आपत्ती किंवा आतंकवादी आक्रमणांच्या वेळी राष्ट्रकर्तव्याची जाण असणारेच भावनाशील न होता तत्परतेने साहाय्य करतात. राष्ट्रकर्तव्याची जाण सर्वांमध्ये निर्माण होण्यासाठी आतापासूनच प्रबोधन आणि जनजागृती करायला हवी. यासह भगवंताची भक्ती आणि साधना केल्यास आपत्काळातून तरून जाता येईल.

उच्च दाबाच्या विजेचा धक्का बसणे

उंचावरील विजेच्या तारांमधून उच्च दाबाचा वीजप्रवाह (हाय व्होल्टेज करंट) वहात असतो. हा वीजप्रवाह अत्यंत धोकादायक असतो. अशा तारांच्या संपर्कात आलेली व्यक्ती गंभीररित्या भाजू शकते. तिच्या शरिराचे स्नायू आखडल्यामुळे ती दूर फेकली जाऊ शकते, तसेच तिची हृदयक्रिया आणि श्वसनक्रिया बंद पडू शकते.

१. विजेचा प्रवाह बंद किंवा खंडित केल्याचे निश्चितपणे ठाऊक होईपर्यंत अपघातग्रस्त व्यक्तीच्या जवळ जाऊ नका. (उच्च दाबाच्या विजेच्या तारांपासून न्यूनतम १८ मीटर दूर रहा; कारण उच्च दाबाच्या तारांतील वीजप्रवाह १८ मीटर अंतरापर्यंत असणार्‍या व्यक्तीवर कोसळू शकतो.)

२. विजेचा प्रवाह बंद किंवा खंडित केल्याचे निश्चितपणे ठाऊक झाल्यानंतर रुग्णाला पडताळा.

३. रुग्णवाहिका बोलावून रुग्णाला रुग्णालयात पाठवा.

आपद्ग्रस्तांना प्रत्यक्ष साहाय्य करा !

१. आपद्ग्रस्तांना सुरक्षित स्थळी न्यावे.

२. आपत्तीग्रस्त लोकांना मानसिक आधार मिळेल, असे प्रोत्साहन द्यावे. मानसिक आधार देण्यासाठी त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क करून द्यावा.

३. आपद्ग्रस्तांना उपास्यदेवतेचा नामजप करण्यास सांगावे.

४. आपद्ग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करावे.

आगीच्या संदर्भातील प्रतिबंधात्मक उपाययोजना 

उपकरणे आणि सिलिंडर यांची काळजी घ्या !

१. इमारतीमध्ये बसवलेल्या अग्नीशमन उपकरणांची योग्य काळजी घ्या.

२. इमारतीचा फायर पंप, इमारतीतील आणि जवळचा पाण्याचा साठा यांविषयी जाणून घ्या.

३. संरक्षक झाकण नसल्यास किंवा सिलिंडरमध्ये दोेष आढळल्यास असा सिलिंडर स्वीकारू नका.

४. भरलेले आणि रिकामे सिलिंडर वेगवेगळे ठेवा. वेगवेगळ्या प्रकारचे सिलिंडर साठवायचे असल्यास त्यांचे विषारी, ज्वलनशील असे गट पाडा.

५. सिलिंडर भूमीवरून घासत ओढू नका किंवा उंचावरून फेकू नका.

६. सिलिंडरच्या जवळ धूम्रपान किंवा अन्य प्रकारच्या ज्वलनास कडक बंदी घाला.

फटाक्यांविषयीची काळजी

१. फटाके घराबाहेर मोकळ्या पटांगणातच लावा. रॉकेटसारख्या आकाशात जाणार्‍या फटाक्यांविषयी विशेष काळजी घ्या. ते लावतांना दारे-खिडक्या व्यवस्थित लावून घ्या.

२. विझलेला फटाका परत पेटवण्याचा प्रयत्न करू नका.

३. फटाके दुसर्‍यांच्या दिशेने फेकू नका.

४. वायू आणि ध्वनी प्रदूषण करणारे फटाके न लावणे, हाच सर्वोत्तम उपाय आहे.