भविष्यवाणी : देशादेशांत भयंकर युद्ध भडकणार आणि राजा गादी सोडून पळून जाणार !

नेवासे (अहिल्यानगर) येथील बाबीर देवस्थानमध्ये वर्तवण्यात आले भाकीत !

अहिल्यानगर – नेवासे तालुक्याच्या सीमेवर असलेल्या पांढरीपूल आणि खोसपुरी येथे असलेल्या बाबीर देवस्थानमध्ये दीपावली सणाच्या यात्रा उत्सवात ‘व्हईक’ वर्तवण्यात येते. ‘व्हईक’ म्हणजे तेथील पुजारी आगामी वर्ष कसे असेल ? यांचा अनुमान वर्तवतात. हे ऐकण्यासाठी शेकडो लोक गर्दी करतात. या कार्यक्रमाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. या वेळी ‘वर्तवलेले भविष्य तंतोतंत तसेच घडते’, अशी भाविकांची श्रद्धाही आहे. प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही ‘पुढील वर्ष म्हणजे वर्ष २०२४ कसे असणार ?’ याविषयी १७ नोव्हेंबर या दिवशी भाकीत वर्तवण्यात आले होते. ‘देशादेशात भयंकर युद्ध भडकणार आणि राजा गादी सोडून पळून जाणार’, या भाकितांसह इतरही भाकिते या वेळी वर्तवण्यात आली. बाबीर देवस्थानचे मुख्य पुजारी बंडूभाऊ पिसाळ यांनी संपूर्ण अंगाला भंडारा लावून घोंगडी टाकून काठीने अंगावर वार झेलत ‘व्हईक’ सादर केले.

काय वर्तवले भाकीत ?

१. चालू वर्षी रोहिणी आणि मृग नक्षत्र कोरडे गेले. जेमतेम पाऊस झाला असला, तरी गहू, ज्वारी बरकत देईल; मात्र हरभरा पहावयास मिळणार नाही. येणारा पावसाळा जेमतेम राहील, हस्त नक्षत्रात हत्तीची सोंड जिकडे फिरेल, जिकडे तिकडे धो धो पाऊस होईल, असे भाकीत पावसाविषयी केले आहे.

२. गाय वासरांना मोल मिळेल आणि नंदी तोळ्याच्या भावात विकला जाईल, असे म्हटले आहे. धुराडीत अंगावर गुलाल रंग उडेल; मात्र गुढी उभारायला संकट येईल. सुगडे पुजलेले जागेवर रहातील.

३. शेळ्या, मेंढ्या चक्कर येऊन पडतील आणि ११ वर्षांच्या आतील बालकांना आरोग्याच्या पीडा निर्माण होतील.