रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातील ध्‍यानमंदिरात ठेवलेल्‍या शाळिग्रामकडे पाहिल्‍यावर साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

‘१८.११.२०२२ या दिवशी मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातील ध्‍यानमंदिरात बसून नामजप करत होते. तेव्‍हा माझ्‍या मनात अनेक विचार येत होते. मला शरणागतीने प्रार्थना करायला सुचत नव्‍हते. मी गुरूंना कशीबशी शरण गेले. त्‍या वेळी माझे लक्ष अकस्‍मात् शाळिग्रामकडे गेले. तेव्‍हा मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती येथे दिल्‍या आहेत.

श्रीमती भाग्‍यश्री आणेकर

१. शाळिग्रामकडे पहाताच माझा नामजप चालू झाला. माझे मन एकाग्र होऊन मला आतूनच आनंद जाणवू लागला.

२. शाळिग्राम काळा कुळकुळीत सुंदर दिसत होता. त्‍याच्‍याकडे पहात असतांना मला त्‍यात पालट दिसू लागला. तो पारदर्शक आणि तेजस्‍वी दिसत होता. त्‍याच्‍या लंबगोलाकार आकृतीत लहानसा उभा चैतन्‍याचा कण दिसत होता.

३. मी त्‍याला शरणागतीने प्रार्थना केली. तेव्‍हा माझे मन शांत आणि स्‍थिर होऊन आनंदाने हेलकावे खाऊ लागले.

४. मला अनाहतचक्र आणि मस्‍तिष्‍क यांत गारवा जाणवू लागला. मला झर्‍याजवळ बसल्‍याप्रमाणे वाटू लागले.

५. मला हलकेपणा जाणवला.

६. मला ‘नामजप करणे थांबवू नये’, असे वाटत होते. मला आतून आनंदावस्‍था जाणवू लागली.

७. शाळिग्रामच्‍या रंगात पालट होऊन मला तो राखाडी रंगाचा दिसू लागला.

८. त्‍याचे चैतन्‍य वाढत गेले आणि तो तेजःपुंज दिसू लागला. त्‍याच्‍यावर चैतन्‍याची प्रभावळ दिसू लागली. मला त्‍याचे तेज सहन होत नव्‍हते.

९. ‘शाळिग्रामच्‍या जवळ असलेली सिंहावर बसलेली श्री दुर्गादेवीची मूर्ती तेजाने झळकत आहे’, असे मला जाणवले.

१०. तिच्‍या चरणांवर वाहिलेले लाल फूल मला तेजस्‍वी दिसत होते.

११. ‘शाळिग्राम साधकांवर चैतन्‍याचा वर्षाव करत आहे’, असे मला जाणवले.

‘शाळिग्रामच्‍या माध्‍यमातून मला हे अनुभवायला मिळाले’, असे जाणवून मला कृतज्ञता वाटली. गुरुकृपेने (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या कृपेने) आलेल्‍या या अनुभूती मी कृतज्ञताभावाने त्‍यांच्‍या चरणी समर्पित करते.’

– श्रीमती भाग्‍यश्री आणेकर (आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के, वय ६६ वर्षे), वाराणसी आश्रम (८.११.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक