निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २५३
१. पोळी बनवण्याच्या सोप्या उदाहरणातून आयुर्वेद शिक्षणाचा शुभारंभ !
‘पोळ्या बनवण्यासाठी जेव्हा आपण कणीक मळतो, तेव्हा तिच्यामध्ये पाण्याचे प्रमाण योग्य असले, तरच पोळी नीट लाटता येते. पाण्याचे प्रमाण जास्त झाले, तर पोळी नीट लाटता येत नाही. ती पोळपाटाला चिकटते. पाणी अगदी न्यून असूनही चालत नाही. तसे झाल्यास कणीक घट्ट होते आणि पोळी लाटायला कष्ट पडतात. लाटलेली पोळी तव्यावर योग्य आचेवरच भाजावी लागते. आच न्यून असेल, तर पोळी फुलणार नाही आणि आच जास्त काळ मोठी राहिली, तर पोळी करपेल.
२. पोळी बनवण्यासारखे लहानसे काम असो किंवा १०० वर्षांचे आयुष्य असो, ‘संतुलन’ महत्त्वाचे !
‘शरिरात वात, पित्त आणि कफ असे ३ घटक असतात. (सध्या केवळ ही ३ नावे लक्षात ठेवा. अनिल, सूरज आणि चंदन अशी ३ मुलांची नावे आपण कशी सहजपणे लक्षात ठेवू, त्याप्रमाणे ही नावे केवळ लक्षात ठेवा.) वर दिलेले पोळीचे उदाहरण नीट लक्षात घेतले, तर आपल्याला ‘वात, पित्त आणि कफ म्हणजे काय’, हे लक्षात घेणे सोपे जाईल. जसे पीठ कोरडे असते, तसा शरिरातील वातही कोरडा असतो. पिठात मिसळलेले पाणी ओलावा निर्माण करते. शरिरात कफ हेच काम करत असतो. बाह्य अग्नीमुळे पोळी भाजली जाते. त्याप्रमाणे शरिरातील पित्तामुळे किंवा अग्नीमुळे (पचनशक्तीमुळे) खाल्लेल्या आहाराचे पचन होत असते. पीठ, पाणी आणि अग्नी यांचे प्रमाण योग्य, म्हणजेच ‘संतुलित’ असेल, तरच पोळी चांगली बनते. अगदी तसेच शरिरात वात, कफ आणि पित्त यांचे ‘संतुलन’ असेल, तर शरीर १०० वर्षे निरोगी राहते.
एकदा का वात, पित्त आणि कफ समजले की, आयुर्वेद समजला ! आयुर्वेद एवढा सोपा आहे. या पुढील भागांतून आपण तो क्रमशः समजून घेऊ.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.११.२०२३)
लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी मार्गिका bit.ly/ayusanatan