‘डीपफेक’ची डोकेदुखी !

संपादकीय

‘डीपफेक’ तंत्रज्ञानाचा फसवणूक आदी करून एखाद्याचे जीवन उद़्‍ध्‍वस्‍त केले जात आहे !

सध्‍या उच्‍चपदस्‍थ अधिकारी, आस्‍थापनांचे प्रमुख, वलयांकित किंवा प्रतिष्‍ठित व्‍यक्‍ती यांचे ‘डीपफेक’ (डीपफेक म्‍हणजे कृत्रिम बुद्धीमत्तेद्वारे व्‍यक्‍तीच्‍या चेहर्‍यात पालट करून फसवणूक करणे) या तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातून शरीर किंवा चेहरे पालटणे, त्‍यांचे आवाज काढणे आदी गोष्‍टी करून संबंधितांची मानहानी, फसवणूक आदी करून त्‍यांचे जीवन उद़्‍ध्‍वस्‍त केले जात आहे. अगदी अमेरिकेचे माजी राष्‍ट्राध्‍यक्ष आणि फेसबूकचे निर्माते मार्क झुकेरबर्गही या फसवणुकीतून सुटले नाहीत. या चित्रफिती जरा ‘धक्‍कादायक’ म्‍हणून बनवल्‍या जात असल्‍याने त्‍या समाजात तेवढ्याच प्रचंड प्रमाणात प्रसारित होतात. त्‍यामुळे ‘आता मोठ्या व्‍यक्‍तींच्‍या काही अशा अविश्‍वसनीय किंवा धक्‍कादायक चित्रफिती समाजात प्रसारित झाल्‍यावर सर्वप्रथम त्‍या ‘डीपफेक’ नाहीत ना ?’ याचीच निश्‍चिती करणे आणि संबंधित व्‍यक्‍तीचीच त्‍या संदर्भातील प्रतिक्रिया घेणे अनिवार्य ठरणार आहे. यापुढे सततच असे होत राहिले, तर कुणी सांगावे लोकांना याचीही सवय होईल आणि लोकांचा या माध्‍यमांवरील विश्‍वासही उडाल्‍यासारखे होईल, यात शंका नाही. विदेशी महिलेच्‍या शरिरावर भारतातील दाक्षिणात्‍य अभिनेत्रीचा चेहरा बसवून तिची अश्‍लील चित्रफीत प्रसारित झाल्‍यावर ती २ दिवस नैराश्‍यात गेली. कुणाच्‍याही संदर्भात असे होईल, यात नवल नाही. अमेरिकेचे माजी राष्‍ट्राध्‍यक्ष बराक ओबामांकरवी अन्‍य माजी राष्‍ट्राध्‍यक्ष ट्रंप यांची असभ्‍य शब्‍दांत निर्भत्‍सना करण्‍यात आली, तर एका जर्मन आस्‍थापनाच्‍या प्रमुखास अन्‍य प्रमुखाचा हुबेहुब आवाज काढून प्रचंड रक्‍कम अधिकोषाच्‍या खात्‍यात भरण्‍यास सांगून फसवण्‍यात आले. अशी अनेक उदाहरणे आता जगभर मोठ्या प्रमाणात घडू लागल्‍याने त्‍याचे लोण आता भारतातही आले आहे. सुपीक भारतियांची डोकी या तंत्रज्ञानातही चालणार आहेत, हे कुणी वेगळे सांगायला नको. ३ वर्षांपूर्वी एका अमेरिकी आस्‍थापनास याचे १५ सहस्र व्‍हिडिओ मिळाले होते. हे सामाजिक माध्‍यम असल्‍याने आताच्‍या घडीला ते किती प्रमाणात होत असेल, याची कल्‍पना करू शकत नाही. पंतप्रधान मोदी यांनीही एका कार्यक्रमात ‘डीपफेक’विषयी चिंता व्‍यक्‍त केली आहे.

अस्सल आणि नक्कल यातील फरक

अतीगंभीर आणि व्‍यापक दुष्‍परिणाम !

सामाजिक माध्‍यम हेच मुळात वैश्‍विक असल्‍याने या माध्‍यमाशी संबंधित प्रत्‍येक चांगली-वाईट गोष्‍ट ही वैश्‍विक बनते आणि संबंधित व्‍यक्‍तीही त्‍यामुळे ‘वैश्‍विक’ बनते ! त्‍यामुळे या तंत्रज्ञानाच्‍या दुष्‍परिणामाचा फटकाही तितकाच मोठा असणार यात शंका नाही. यातून महिलांची विशेषतः लैंगिक स्‍वरूपाची फसवणूक, श्रीमंतांची आर्थिक फसवणूक, प्रतिष्‍ठितांची किंवा लोकप्रतिनिधींची अयोग्‍य बोलून केलेली सामाजिक मानहानी, अशा प्रकारच्‍या फसवणुका सध्‍या तरी उघडकीस येत आहेत. यात संबंधितांना होणार्‍या मानसिक त्रासांमुळे त्‍यांनी आत्‍महत्‍या वगैरे करून नवीन सामाजिक समस्‍या निर्माण झाली, तर अजिबात आश्‍चर्य वाटायला नको ! यात सर्वाधिक युवती किंवा महिला भरडल्‍या जाणार आहेत, हेही वेगळे सांगायला नको. मोठ्या व्‍यक्‍ती असे काही झाल्‍यावर त्‍यांच्‍या हाताखालील यंत्रणा राबवून गुन्‍हा नोंद करू शकतात; परंतु कुठलाही कायदेशीर लढा देणे हे सर्वसामान्‍यांसाठी अतिशय कठीण असते. वरीलप्रमाणे फसवणूक झालेली दाक्षिणात्‍य अभिनेत्री ही अभिनेत्री असल्‍याने या प्रकरणाचा अधिक गवगवा झाला आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी कारवाईचे आदेश दिले. अशा प्रकारे सामान्‍य मुलगी भरडली गेल्‍यावर थोडेच होणार आहे ? सामाजिक माध्‍यमांमुळे त्‍याचा प्रसार पुष्‍कळ प्रमाणात झाल्‍यावर त्‍यातून झालेली हानी कुठल्‍याही सांत्‍वनाने किंवा शिक्षेने भरून निघणारी नाहीच. अशा चुकीच्‍या चित्रफितीमुळे आस्‍थापनांचे समभागही गडगडल्‍याची उदाहरणे आहेत. ‘मॉर्फींग’ तंत्रज्ञानापेक्षाही हे तंत्रज्ञान अधिक चांगल्‍या दर्जाचे असल्‍याने या तंत्रज्ञानाचा वापर बेमालूमपणे केलेला दिसतो आणि सहजासहजी लक्षात येत नाही. त्‍यामुळे जोपर्यंत संबंधित व्‍यक्‍ती स्‍वतः ते सांगत नाही, तोपर्यंत कदाचित् ते कळूही शकत नाही.

तंत्रज्ञानाच्‍या दुष्‍परिणामावरील उतारा !

‘माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २०००’ या कायद्यानुसार या फसवणुकीच्‍या विरोधात तक्रार प्रविष्‍ट करता येते. यातील ‘कलम ६६ ड संगणक संसाधनांचा वापर’ यानुसार ३ वर्षांपर्यंत कारावास आणि १ लाख रुपयांपर्यंतचा दंडही होऊ शकतो; परंतु नेटाने हा लढा दिला गेला पाहिजे. तंत्रज्ञानाच्‍या प्रगतीमुळे आणि इंटरनेटच्‍या जाळ्‍यामुळे विविध माध्‍यमांतून होणारी अश्‍लीलता रोखण्‍यास मर्यादा येतात. सामाजिक माध्‍यम आणि तंत्रज्ञान यांच्‍यापुढे हतबल होत एका वृत्तपत्राने भूमिका मांडली, ‘लोकांनी त्‍यांची डोकी आणि भावना उद्दीपित न होऊ देणे हा त्‍यातल्‍या त्‍यात संकटास भिडण्‍याचा समजूतदार मार्ग आहे.’ हे चूक आहे असे नाही; परंतु ‘समाजात विविध माध्‍यमांतून अश्‍लीलता वाढत असतांना लोकांनी मात्र संयमी रहायला हवे, हे कितपत शक्‍य आहे ?’ सध्‍या समाजातील स्‍त्रियांच्‍या संदर्भातील गुन्‍ह्यांची भयावह संख्‍या आपण पहातच आहोत. त्‍यामुळेच ‘डीपफेक’चे हे भयावह संकट रोखण्‍यासाठी समाज संयमी आणि नीतीमान असणे आवश्‍यक आहे अन् हे गुण साधनेने किंवा उपासनेनेच येऊ शकतात. त्‍यामुळे समाज धर्माचरणी असणे आवश्‍यक आहे. शेवटी तंत्रज्ञान कितीही पुढे गेले, तरी आदर्श समाजाच्‍या निर्मितीसाठी समाज सनातन धर्माची तत्त्वे अनुसरणारा असणे आवश्‍यक आहे, हे यातून लक्षात येते. प्राचीन सनातन भारतीय समाजात आधुनिक उपकरणांचे तंत्रज्ञान कदाचित् नसले, तरी वेदविज्ञानासमवेत त्‍याच धर्मपालनाने आलेली नीतीमानता, संयम, त्‍याग आदी गुण असणारा आदर्श समाज होता.

तंत्रज्ञानाचे दुष्‍परिणाम टाळण्‍यासाठी समाजाने धर्माचरण करून नीतीवान आणि संयमी होणे अपेक्षित !