Tunnel Collapse : आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ञांनी बौखनाग मंदिरात प्रार्थना केल्यावर उत्तरकाशीतील अपघात स्थळी झाले मार्गस्थ!

९ दिवसांपासून बोगद्यात बोगद्यात अडकले आहेत ४१ कामगार !

आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ञ प्रा. आर्नोल्ड डिक्स

उत्तरकाशी (उत्तराखंड) – नऊ दिवस उलटले, तरी येथील सिल्क्यरा बोगद्यात ४१ कामगार अजूनही अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी युद्ध स्तरावर प्रयत्न चालू आहेत. अशातच २० नोव्हेंबरच्या सकाळी ‘इंटरनॅशनल टनेलिंग अंडरग्राउंड स्पेस असोसिएशन’चे अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ञ प्रा. आर्नोल्ड डिक्स हेही उत्तरकाशीत पोचले. ऑस्टे्रलिया वंशाचे डिक्स यांनी बचाव कार्याचा आढावा घेण्यापूर्वी बाबा बौखनागच्या मंदिरात पूजा केली.

१. डिक्स यांनी ‘व्हर्टिकल ड्रिलिंग’साठी दोन ठिकाणे निश्‍चित केली आहेत.

२. दुसरीकडे ‘सतलज जलविद्युत् निगम’ या सरकारी आस्थापनाचे मुख्य अभियंता जसवंत कपूर म्हणाले की, गुजरात आणि ओडिशा येथून आणखी दोन ‘ड्रिलिंग मशीन्स’ मागवण्यात आली आहेत. त्यांचे वजन अनुमाने ७७ टन असून ते २१ नोव्हेंबरपर्यंत येथे पोचण्याची अपेक्षा आहे.

३. ‘व्हर्टिकल ड्रिलिंग’ यंत्रासाठी सीमा रस्ता संघटनेने १ सहस्र २०० मीटरपैकी ९०० मीटर रस्ता सिद्ध केला आहे.

४. गेल्या ७ दिवसांत बचावासाठी आलेली ४ यंत्रे आणि ३ योजना अपयशी ठरल्या आहेत. नवीन धोरणानुसार, एकूण ९ आस्थापने एकाचे वेळी ५ बाजूंनी बोगदा खोदणार आहेत.

५. १२ नोव्हेंबरच्या पहाटे ४ वाजता येथील सिल्क्यरा बोगद्यात अपघात झाला. बोगद्याच्या प्रवेशबिंदूच्या २०० मीटर आत ६० मीटर माती खचली. त्यामुळे त्यात ४१ कामगार अडकले. बचाव कार्यादरम्यान बोगद्यात आणखी दगड पडले आणि त्यामुळे ढिगारा एकूण ७० मीटरपर्यंत पसरला. बोगद्यात अडकलेले कामगार हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, बंगाल आणि ओडिशा या राज्यांतील आहेत.