हिरव्यावर मर्जी, भगव्याची ॲलर्जी !

संपादकीय

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथील जगधात्री पूजेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात केलेल्या भाषणामध्ये ‘भाजप सरकार प्रत्येक वस्तूला भगवा रंग देऊन भगवेकरण करत आहे’, असे वक्तव्य केले. यासाठी त्यांनी ‘मेट्रोच्या स्थानकांना भगवा रंग देणे’, तसेच ‘भारताच्या क्रिकेट संघाची जर्सी भगव्या रंगाची करण्यात आली’, अशी काही उदाहरणे देऊन यावर आक्षेपही घेतला. हिरवा रंग जसा इस्लामचे प्रतीक मानला जातो, तसे भगवा रंग म्हटला की, तो हिंदुत्वाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. त्यामुळे ‘ममता बॅनर्जी यांची पोटदुखी भगव्या रंगामुळे नाही, तर हिंदुत्वाच्या अंगीकारामुळे आहे’, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. वर्ष २०११ मध्ये बंगालमध्ये साम्यवाद्यांना पराभूत करून ममता बॅनर्जी प्रथम सत्तेत आल्या. काँग्रेसमधून बाजूला होऊन स्वत:चा वेगळा पक्ष स्थापन केलेल्या ममता बॅनर्जी यांनी स्वत:च्या तृणमूल काँग्रेस पक्षामध्येही काँग्रेसप्रमाणेच मुसलमानांच्या लांगूलचालनाचे राजकारण कायम ठेवले. देशातील मुसलमानांची दुसर्‍या क्रमांकाची लोकसंख्या असलेल्या बंगालमध्ये मुसलमानांच्या तुष्टीकरणासाठी ममता यांनी इमामांना प्रतिमास वेतनही चालू केले. याचसमवेत अनेकांनी ममता यांचे नमाजपठणही पाहिले असेल. एक हिंदु महिला मुसलमानांच्या मतांसाठी इतक्या टोकाचा मुसलमानधार्जिणेपणा केवळ सत्तेसाठी बाळगत आहे. याचे कारण बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या आमदारांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक आमदार मुसलमान आहेत. अन्य आमदारांच्या मतांमध्येही मुसलमानांच्या मतांचे पारडे जड आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपद (राज्याची सत्ता) राखण्यासाठी ममता बॅनर्जी यांना भगव्या रंगामुळे पोटशूळ उठला नाही, तर नवलच म्हणावे लागेल.

केंद्रशासनाने नवीन शैक्षणिक धोरणातील अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश करण्याचा विषय जेव्हा पुढे आला, तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांनी ‘शिक्षणाचे भगवेकरण’, अशी आरोळी ठोकली; मात्र त्यापूर्वी ‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या पाठ्यपुस्तकात मोगल आक्रमकांवर पानेच्या पाने भरण्यात आली, त्याला ‘पाठ्यपुस्तकाचे हिरवेकरण’ म्हणायचे का ? आणि जर तसे असेल, तर हे हिरवेकरण काँग्रेसच्या काळातच झाले होते. विषय केवळ पाठ्यपुस्तकांपुरता मर्यादित नाही, ‘बात निकली है, तो दूर तक जाएगी’, या उक्तीप्रमाणे स्वातंत्र्यानंतर भारताच्या इस्लामीकरणासाठी काँग्रेसने किती धोरणे राबवली, याची गणतीही करता येणार नाही. मुसलमानांना वाटेल ती जागा बळकावण्यासाठी केलेला ‘वक्फ कायदा’ असो, वर्ष १९४७ पर्यंतच्या मंदिरांचे करण्यात आलेले इस्लामीकरण कायम ठेवण्यासाठी केलेला ‘द प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’ असो किंवा मुसलमानांच्या विकासासाठी स्वतंत्रपणे सिद्ध केलेला ‘सच्चर आयोग’ असो, हा काँग्रेसचा मुसलमानधार्जिणेपणा नाही का ? हा मुसलमानधार्जिणेपणा बहुसंख्य असूनही हिंदूंनी अनेक वर्षे निमूटपणे सहन केला, त्याचे काय ? त्या वेळी देशाचे हिरवेकरण होत आहे; म्हणून हिंदूंनी कधी आवई उठवली नाही. उलट काँग्रेसने सर्वधर्मसमभाव आणि धर्मनिरपेक्षता यांच्या नावाखाली स्वत:चा मुसलमानधार्जिणेपणा हिंदूंच्याही गळी उतरवला. आता भाजपच्या सत्तेत हिंदूंच्या हिताचे काही निर्णय घेण्यात आल्यावर ममता बॅनर्जी यांच्यासारख्या नेत्यांनी भगवेकरणाच्या नावाने छाती बडवायला प्रारंभ केला आहे.

हिंदूंना संभ्रमित करण्याचे पाप !

बंगालमध्ये ‘वन्दे भारत’ रेल्वेच्या उद्घाटनाच्या सरकारी कार्यक्रमात भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’ची घोषणा दिल्यामुळे ममता बॅनर्जी यांनी व्यासपिठावर जाण्यास नकार देत त्यांनी तीव्र असंतोष व्यक्त केला. धर्मनिरपेक्ष राष्ट्रात ‘जय श्रीराम’ ही घोषणा जर ममता बॅनर्जी यांना ‘धार्मिकतावाद’ वाटतो, तर इतक्या वर्षांत मुसलमानांना धर्माच्या आधारे ज्या सवलती देण्यात आल्या, त्या निधर्मीपणाच्या कोणत्या व्याख्येत बसतात ? याचे उत्तर ममता बॅनर्जी देतील का ? काही मासांपूर्वी बंगालमध्ये झालेल्या पंचायत निवडणुकीच्या काळात परगणा नावाच्या भागातून जात असतांना ममता बॅनर्जी यांच्या गाडीच्या ताफ्याजवळ भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’ घोषणा दिल्यामुळे त्या चवताळल्या. त्यांनी गाडीच्या बाहेर येऊन ‘जय श्रीराम’ची घोषणा देणार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. केवळ नेतेमंडळी नव्हे, तर देशातील समस्त पुरोगामी आणि विचारवंत म्हणवणारे यांनी या तथाकथित धर्मनिरपेक्षतेचे भूत भारतियांच्या माथी मारून त्यांनाही संभ्रमित करण्याचे काम केले आहे. यामुळे केवळ हिंदूंचीच नव्हे, तर भारताची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे.

एक तर धर्माच्या आधारे फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली. त्यानंतरही भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यात आले नाही. बरे भारताला ‘धर्मनिरपेक्ष राष्ट्र’ घोषित केल्यानंतर त्याची टिमकी वाजवून हिंदूंची संस्कृती नामशेष करायला निघाला असाल, तर हिंदूंनी का म्हणून सहन करावे ? भारतीय संघाच्या जर्सीचा रंग भगवा असला काय ? किंवा निळा असला काय ? यामुळे फारसा फरक पडत नाही; परंतु या आडून हिंदुत्वाला ‘आतंकवादी’ ठरवण्याचा प्रयत्न ही मंडळी करत आहेत, हे अधिक घातक आहे.

‘भगवद्गीतेचे शिक्षण देणे, म्हणजे शिक्षणाचे भगवेकरण आणि अल्पसंख्यांकांच्या शाळांमध्ये कुराण अन् बायबल शिकवणे, म्हणजे निधर्मीपणा असेल’, तर अशी धर्मनिरपेक्षता हिंदूंच्या काय कामाची ? याच तथाकथित धर्मनिरपेक्षतेच्या नावाने काँग्रेसने हिंदूंना धर्मशिक्षणापासून वंचित ठेवले. ‘हिंदूंना धर्मनिरपेक्ष करायचे; मात्र मुसलमानांच्या धर्मांधपणाला गोंजारायचे’, ही तथाकथित धर्मनिरपेक्षता हिंदूंनी आणखी किती काळ सहन करायची ? हिरव्याची मर्जी सांभाळणार्‍या आणि भगव्याची ॲलर्जी बाळगणार्‍या या तथाकथित धर्मनिरपेक्ष नेत्यांपायी उच्च भारतीय संस्कृतीपासून हिंदूंनी आणखी किती काळ वंचित रहायचे ? यावर हिंदूंनी आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.

भारतीय संस्कृतीचा प्रचार हे भगवेकरण असेल, तर भारताला याच भगवेकरणाची आवश्यकता आहे !