National Press Day – पत्रकारांनी जनहिताच्या दृष्टीने अशासकीय संस्थांवरही लिहावे ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

राष्ट्रीय पत्रकार दिन

राष्ट्रीय पत्रकार दिन सोहळ्यात बोलतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी, १६ नोव्हेंबर (वार्ता.) : पत्रकारांनी सरकारच्या चुका दाखवल्या पाहिजेत आणि त्याचबरोबर जनहिताच्या दृष्टीने अशासकीय संस्थांच्या (‘एन्.जी.ओ.’च्या) चुकांवरही उजेड टाकावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. पणजी येथे मिनेझिस ब्रागांझा सभागृहात आयोजित केलेल्या राष्ट्रीय पत्रकार दिन सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. कार्यक्रमाला माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे संचालक दीपक बांदेकर यांचीही उपस्थिती होती.

मागील रांगेत सत्कारमूर्ती पत्रकार आणि समोर बसलेले डावीकडून दीपक बांदेकर, मुख्यमंत्री डॉ. सावंत अन् राजतिलक नाईक

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘पत्रकारांनी सरकारच्या चुका दाखवाव्यात. दाखवलेल्या चुका सुधारण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत असते.’’

पत्रकारांच्या आतापर्यंतच्या सर्व मागण्या संमत

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘पत्रकारांच्या आतापर्यंत सर्व मागण्या संमत केल्या आहेत. ‘पत्रकारितेमध्ये गुन्हेगारीचा शिरकाव झाला आहे’, असे विधान मी कधीही केलेले नाही आणि मी तसे म्हणणारही नाही; मात्र पत्रकारांना तसे वाटत असल्याने पत्रकार संघटनेने त्यावर तोडगा काढावा. सरकार यासाठी आवश्यक सहकार्य करण्यास सिद्ध आहे. पत्रकारांसाठी सवलतीच्या दरात ‘ई-बाइक’ (विजेवर चालणारी दुचाकी) योजना मार्गी लावली जाणार आहे, तसेच पत्रकार सुरक्षा कायद्याचीही कार्यवाही होणार आहे. सरकारी खात्यातील जनसंपर्क अधिकार्‍यांना पत्रकारांना आवश्यक माहिती देण्याची सूचना करण्यात आली आहे.’’ कार्यक्रमाच्या प्रारंभी गोवा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजतिलक नाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्रकारांपुढील समस्यांचे कथन केले.

ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार

याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार श्री. प्रमोद खांडेपारकर यांना त्यांच्या पत्रकारितेतील असामान्य योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्री. खांडेपारकर यांनी सत्काराला उत्तर देतांना राज्यातील पत्रकारितेची ६ दशकांपूर्वीची परिस्थिती आणि त्यांच्या कारकीर्दीच्या प्रवासातील संघर्ष अन् यशाची आठवण सांगितली. पत्रकारितेच्या क्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांनी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दिल्याबद्दल सरकारचे आभार मानले.

त्याचप्रमाणे नवहिंद टाइम्सचे संपादक श्री. विजय डिसोझा, ज्येष्ठ पत्रकार ॲशली रुझारियो, दैनिक गोमंतकचे ज्येष्ठ पत्रकार श्री. शेखर उपाख्य विलास महाडिक आणि श्री. नरेंद्र तारी अन् लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार श्री. विठू सुखडकर यांना त्यांच्या व्यवसायातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.