२४ घंट्यांनंतर सुटका होण्याची शक्यता
उत्तरकाशी (उत्तराखंड) – यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील सिल्क्यारा बोगद्यात भूस्खलनामुळे अडकलेल्या ४० कामगारांची अद्याप सुटका झालेली नाही. ५ दिवसांनंतरही त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. सध्या या कामगारांना प्राणवायू आणि अन्न हे एका लहान पाईपद्वारे पोचवण्यात येत आहे. हे सर्व कामगार सुखरूप आहेत. त्यांच्याशी संपर्क साधण्यात येत आहे. ढिगारा हटवण्यासाठी विदेशातून यंत्र मागवण्यात आले आहे. सध्या अडकलेल्या कामगारांच्या मानसिक स्थितीकडे लक्ष ठेवण्यात येत आहे. बोगद्यामधून त्यांना काढण्यासाठी अजूनही २४ घंटे लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बोगदा असलेल्या डोंगराची स्थिती नाजूक आहे. त्या पार्श्वभूमीवर नॉर्वे आणि थायलंड येथील तज्ञांचे मार्गदर्शन घेतले जात आहे. कामगारांना बाहेर काढण्यासाठी ९० सेंटीमीटर रुंदीचा पाईप टाकण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या पाईपमध्ये ‘एक्सेप टनेल’ बसवले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाईपमधून बाहेर येतांना कामगारांना कुठल्याही प्रकाराचा त्रास होणार नाही.