देहलीमध्ये दिवाळीच्या काळात ५२५ कोटी रुपयांची मद्यविक्री !

दिवाळीच्या एक दिवस आधी दारूच्या २८ लाख बाटल्यांची विक्री !

नवी देहली – दिवाळीमध्ये आतपर्यंत वर्ष २०२२ च्या तुलनेत जवळपास दुप्पट मद्यविक्री झाल्याचा तपशील समोर आला आहे. देहली उत्पादन शुल्क विभागाच्या  आकडेवारीनुसार, गेल्या १८ दिवसांत, म्हणजे दिवाळीपूर्वी ३ कोटी ४ लाख दारूच्या बाटल्यांची विक्री झाली आहे. याची एकूण किंमत तब्बल ५२५ कोटी ८४ लाख रुपये इतकी आहे. गेल्या वर्षी दिवाळीपूर्वी याच काळात २ कोटी ११ लाख दारूच्या बाटल्यांची विक्री झाली होती. यावर्षी दिवाळीच्या एक दिवस आधी दारूच्या जवळपास २८ लाख  बाटल्यांची विक्री झाली.

उत्पादन शुल्क विभागाच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, सध्या सणासुदीचा हंगाम आणि ‘ड्राय डे’ (दारूबंदी दिन) असल्यामुळे या काळात मद्याची विक्री वाढते. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मासांत सामान्यतः ‘ड्राय डे’ मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे या काळात सरासरी दारूची विक्री वाढते.

संपादकीय भूमिका

दिवाळी म्हणजे प्रभु श्रीरामांनी वनवास संपवून अयोध्येत परतल्याचा क्षण ! हा सण मद्य पिऊन साजरा करणारे जन्महिंदु कधीतरी धार्मिक असू शकतील का ? अशा जन्महिंदूंकडून कधी हिंदु धर्माचे रक्षण आणि संवर्धन होऊ शकते का ?